आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Chance To Cricket Playing Children Sachin Tendulkar

क्रिकेट खेळणा-या प्रत्येक चिमुकल्याला संधी मिळावी - सचिन तेंडूलकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तहानभूक विसरून, अभ्यासाला सुटी देऊन, कोसाचे अंतर पार करून, क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहणा-या मुंबईच्या उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी संधी उपलब्ध करा. संघातील 11 ऐवजी सर्वच्या सर्व 15 खेळाडूंना किमान 3-3 सामने खेळण्याची संधी मिळू शकेल असा काहीतरी नवा ‘फॉर्म्युला’ तयार करा, असे कळकळीचे आवाहन आज सचिन तेंडुलकरने मुंबई क्रिकेट असोसिएशनने केलेल्या गौरवाला उत्तर देताना केले. पाचशे धावा ठोकणारा युवा खेळाडू पृथ्वी शॉ आणि युवा गोलंदाज मुशीर यांचा सत्कारही या वेळी एमसीएने केला.
या वेळी सचिनचे गुरू रमाकांत आचरेकर यांनाही सन्मानित करण्यात आले. निवृत्तीनंतर प्रथमच सचिनने क्रिकेटविषयक सूचना आज मांडून आपल्या भूमिकेतील बदल जाहीर केला. सचिन आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना म्हणाला, क्रिकेट खेळणा-या प्रत्येक लहान मुलाला खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. संघात एकाच वेळी फक्त 11 जणच खेळू शकतात. मात्र अन्य खेळाडू आहेत त्यांची काय चूक आहे? कधी खेळपट्टी वेगवान गोलंदाजीस अनुकूल असते म्हणून फिरकी गोलंदाजाला राखीव खेळाडूत बसविले जाते. त्याची अंतिम 11 जणांत खेळण्याची संधी नाकारली जाते. त्याऐवजी सर्वांना संधी मिळेल, असे काही तरी एमसीएने शोधून काढावे.
क्रिकेट खेळण्याची इच्छा असणा-यांमध्ये गरीब, श्रीमंत सगळेच असतात. मात्र ज्यांना क्रिकेट खेळायचे आहे, त्यांना खेळण्याची संधी नाकारली जाऊ नये. त्यासाठी शालेय व महाविद्यालय क्रिकेटमध्ये अधिकाधिक खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी असे मला वाटते. 10 हजारांपेक्षा अधिक खेळाडूंचा ‘पाया’ मला पाहायला आवडेल. मला शालेय, महाविद्यालयीन क्रिकेटपटूंच्या सहभागाने उभारलेले मोठे चित्र पाहायला आवडेल. त्यामुळेच मुंबईच्या क्रिकेटचा स्तर आणखी उंचावेल. माझा मुलगा अर्जुन खेळत आहे म्हणून मी हे बोलत नाही.
मुंबई संघाच्या गौरवशाली रणजी विजयाचे दाखले आम्ही ड्रेसिंगरूममध्ये आजही देत असतो. या वेळीही प्रमुख खेळाडू भारतीय संघासोबत गेल्यानंतर मुंबई संघाला आता ख-या आव्हानांचा सामना करायचा आहे. सीनियर
खेळाडू संघात नसताना मिळालेल्या यशाची चवच आगळी असते. तेव्हा विद्यमान मुंबई संघालाही माझे तेच सांगणे आहे. सीनियर्स संघात नसताना ट्रॉफी जिंका, तुमच्या स्वागतासाठी येणा-यांमध्ये मी सर्वप्रथम असेन.