आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Time To Self, Chandu Borde's Advise To Sachin

स्वत:साठीही आता थोडे जग रे बाबा!, माजी खेळाडू चंदू बोर्डे यांचा सचिनला सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोळा वर्षांचा सचिन 1989 मध्ये पाकिस्तानात जाऊन आयुष्यातला पहिला कसोटी सामना खेळला होता. त्या वेळी ज्येष्ठ कसोटीवीर ‘पँथर’ चंदू बोर्डे भारतीय संघाचे मॅनेजर होते. तेव्हा संघाच्या प्रशिक्षकाची भूमिकादेखील मॅनेजरलाच वठवावी लागायची. सचिन आणि बोर्डे यांच्यात खास नाते निर्माण झाले. आजही बोर्डे समोर दिसले की सचिन ‘सर’ म्हणत त्यांच्यासमोर आदराने झुकतो. बोर्डेसुद्धा सचिनबद्दल अंतरीच्या जिव्हाळ्याने भरभरून बोलतात.
घरातल्या वडिलधा-याने व्यक्त करावी अशीच भावना त्यांनी सचिनबद्दल बोलून दाखवली. ते म्हणाले, ‘‘सन 1९८९ पासून चोवीस वर्षे सचिनने सतत भारतीय क्रिकेटची सेवा केली. कोट्यवधी लोकांच्या अपेक्षांचे ओझे खांद्यावर घ्यायचे आणि त्यात पात्र ठरण्यासाठी मैदानात आव्हानांना तोंड द्यायचे, हे काम किती अवघड आहे, हे फक्त सचिनच जाणो. म्हणूनच मला आता प्रेमळपणे सांगायचेय. आता थोडे दिवस तू क्रिकेटपासून दूरच राहा. कुटुंबाबरोबर आनंदात दिवस काढ. निवृत्ती एन्जॉय कर.’’ क्रिकेटसाठी सचिनने किती तरी गोष्टींचा त्याग केला. आता त्याने जीवनाचा आनंद लुटावा...पण मला खात्री आहे, सचिनचे क्रिकेटवर इतके प्रेम आहे की तो फार काळ क्रिकेटपासून दूर राहूच शकणार नाही. तो क्रिकेटविश्वात पुन्हा परतेल.
मात्र, क्रिकेटमधली ही ‘सेकंड इनिंग’ सुरू करण्यापूर्वी सचिनने भरपूर विश्रांती घ्यावी, असा प्रेमाचा आग्रह बोर्डे धरतात. ते म्हणाले की, क्रिकेटमधल्या या दुस-या इनिंगमध्ये त्याने युवा क्रिकेटपटूंमधले
टॅलेंट ओळखून त्याला आकार देण्याचे काम करावे. सचिनमध्ये जी क्रिकेटची
जाण अन् प्रतिभा आहे , त्याचा थोडासा जरी फायदा कमी वयातल्या खेळाडूंना घेता
आला तर त्यासारखे दुसरे भाग्य नाही. सचिनच्या प्रत्येक गोष्टीतून युवा खेळाडूंना खूप काही शिकण्यासारखे आहे. सचिनकडे बघून आदर्श जीवन जगता येईल.
दोष दाखवता येतच नाही
‘‘क्रिटिसाइज करावे असे सचिनमध्ये काहीच नाही. त्याच्यासारखी अत्यंत शिस्तबद्ध जीवनशैली आणि खेळावरची अतीव श्रद्धा क्वचितच इतर कोणामध्ये पाहायला मिळेल. पाकिस्तानच्या पहिल्या दौ-यात कोच म्हणून मी त्याला काही टिप्स दिल्या होत्या. चेंडू ड्राइव्ह करताना तो हवेत राहायचा. ही चूक टाळण्यासाठी नेटमध्ये आम्ही तासन्तास सरावही केला. पुढे 2007 मध्ये इंग्लंड दौ-यावर मी भारतीय संघाबरोबर होतो. चूक लक्षात आणून दिल्यानंतर ती दुरुस्त होण्यासाठी कष्ट घेणारा त्याच्यासारखा दुसरा फलंदाज नाही, असे बोर्डे म्हणतात.