आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅनडाविरुद्ध भारत 4-2 ने विजयी; जसप्रीत कौरचे दोन गोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो- रितुराणीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने गुरुवारी राष्ट्रकुल स्पर्धेला दमदार विजयाने सुरुवात केली. भारताच्या महिला संघाने सलामी सामन्यात कॅनडाचा 4-2 अशा फरकाने पराभव केला. यासह भारताने स्पर्धेच्या अ गटात विजयाचे खाते उघडले.

राणी रामपाल (22 मि.), पूनम राणी (29 मि.) आणि जसप्रीत कौर (37, 52 मि.) यांनी केलेल्या गोलच्या बळावर भारताने सामना जिंकला. कॅनडासाठी ब्रिइन्ने आणि कार्ली जॉन्सन यांनी प्रत्येकी एक गोल केला.

जागतिक क्रमवारीत 13 व्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. राणीने 22 व्या मिनिटाला कॅनडाच्या गोलरक्षकाला हुकलावणी देत गोलचे खाते उघडले. यासह भारताने लढतीत 1-0 ने आघाडी मिळवली. त्यानंतर अवघ्या सात मिनिटांत पूनम राणीने भारताच्या आघाडीला 2-0 ने मजबूत केले. तिने 29 व्या मिनिटाला भारताकडून दुसरा गोल केला होता.

आफ्रिका 16-0 ने विजयी
टोबॅगो-त्रिनिदादविरुद्ध लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने 16-0 अशा मोठ्या फरकाने विजयाची नोंद केली. आफ्रिकेचा हा स्पर्धेतील सर्वात मोठा विजय ठरला. तसेच इंग्लंडच्या महिला संघाने वेल्सचा 2-0 अशा फरकाने पराभव केला.

अंका, हरमिंदरची विजयी सलामी
अंका अलकामोनी, हरमिंदर पाल सिंग आणि महेश मानगावकरने राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय स्क्वॅश संघाला चांगली सुरुवात करून दिली. यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघाला पदकाचा प्रबळ दावेदार मानले जाते. दीपिका पल्लीकल आणि जोश्ना चिनप्पाला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली. भारताच्या अंकाने महिला एकेरीच्या लढतीत केनियाच्या खालेगा निमजीवर 11-2, 11-3, 11-6 ने मात केली. पुरुष एकेरीत महेशनने केनियाच्या हरदीप रिलला पराभूत केले. हरमिंदर संधूने आयर्लंडच्या मिचेलवर 11-9, 11-5, 11-5 अशा फरकाने विजय मिळवला.