आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Glasgow 2014 LIVE: The Commonwealth Games Opening Ceremony,News In Marathi

राष्ट्रकुल स्पर्धा: भारताची आजपासून विजयी मोहीम, भारत आणि कॅनडा समोरासमोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो- स्कॉटलंड येथील 20 व्या राष्ट्रकुल स्पर्धेतील आपल्या विजयी मोहिमेला दमदार सुरुवात करण्यासाठी भारतीय संघाचे खेळाडू सज्ज झाले आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी गुरुवारपासून पदकांच्या लढतींना रंगत चढणार आहे. यासाठी स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू कला-कौशल्य दाखवण्यासाठी उत्सुक आहेत.

रितू राणीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ आणि कॅनडा यांच्यात हॉकीचा सलामी सामना रंगणार आहे.कॅनडाविरुद्ध सामन्यात आतापर्यंत भारतीय संघाचा दबदबा राहिला आहे. त्यामुळे कॅनडाविरुद्धचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघाचा विजयासाठी प्रयत्न असेल.
भारत आणि कॅनडाच्या महिला यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या हॉकीतील सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत दोन लढती झाल्या. या दोन्ही सामन्यांत भारताने विजयश्री खेचून आणली. भारत आणि कॅनडा यांच्यात शेवटचा सामना 2012 मध्ये झाला होता. या सामन्यात भारताने 4-0 ने एकतर्फी विजय मिळवला होता. यापूर्वी 2002 आणि 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत हे दोन्ही संघ समोरासमोर आले होते. मात्र, भारतीय संघाला राष्ट्रकुल स्पर्धेत प्रतिस्पर्धी कॅनडाला दुबळे मानून चालणार नाही. कॅनडाच्या महिलांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या संघाच्या कामगिरीचा दर्जाही उंचावला आहे.

भारतीय हॉकी संघ फॉर्मात
भारतीय संघाने नुकताच मलेशियाचा दौरा केला आहे. या दौर्‍यातील मालिका विजयाने भारतीय महिला संघ जबरदस्त फॉर्मात आहे. हाच फॉर्म आता कायम ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

युरोपियन चॅम्पियनशिपला अधिक पसंती
पुढील महिन्यात झुरिच येथे होणारी युरोपियन चॅम्पियनशिप डोळ्यासमोर ठेवून 20 व्या राष्ट्रकुल स्पर्धेतून इंग्लंडच्या ड्वेन चेम्बर्सने रिले संघातून माघार घेतली. या 36 वर्षीय चेम्बर्सने 2002 पासून राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग नोंदवला नाही. यंदा तो पुरुषांच्या 4 बाय 100 मीटर रिले संघाचा सदस्य होता. मात्र, तो आता 12 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये वैयक्तिक 100 मीटर प्रकारावर लक्ष केंद्रित करेल.

क्रमवारीत दबदबा
भारतीय महिला संघ जागतिक क्रमवारीत 13 व्या स्थानावर आहे, तर कॅनडा संघ 20 व्या स्थानावर आहे. सात स्थानांनी भारतीय संघ आघाडीवर आहे.

यातून भारतीय संघाची निवड
रितुषा आर्या, अनुपा बार्ला, दीपिका, वंदना कटारिया, किरणदीप कौर, दीप एक्का, नवज्योत कौर, जसप्रीत कौर, सुशीला पुखरंबम, लिलिमा मिंज, राणी, पूनम राणी, रितू राणी, सविता, नमिता टोप्पो, अनुराधा.

आजच्या खास लढती
० बॅडमिंटन : भारत वि. घाना (मिश्र), दु. 1.30 वाजेपासून
० हॉकी : भारत वि. कॅनडा,

रात्री 8.30 वाजेपासून
० स्क्वॅश : सौरव घोषाल वि. ज्युलिस स्नैग, संध्या. 6.00 वाजेपासून
० टेबल टेनिस : भारत वि. बार्बाडोस, दु. 2.00 वाजेपासून
० वेटलिफ्टिंग : संगीता, मीराबाई, सुखेन, गणेशचे सामने.
० ज्युदो : नंदलाल, नवज्योत सुशीला, शिवानीचे सामने

घानासमोर आज भारताचे आव्हान
राष्ट्रकुल स्पर्धेच्या बॅडमिंटन खेळ प्रकारात घाना संघासमोर गुुरुवारी भारतीय संघाचे तगडे आव्हान असेल. सलामी सामन्यात धडाकेबाज विजय मिळवून स्पर्धेतील आपल्या पदकाच्या मोहिमेला चांगली सुरुवात करण्याची संधी आहे. सायना नेहवालच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या विजयाची मदार सिंधूवर असेल. मिश्र दुहेरीत भारत आणि घाना यांच्यात सामना रंगणार आहे. सायनाच्या गैरहजेरीत भारतीय संघाला पदक मिळवून देण्याची जबाबदारी आता सिंधूवर आहे.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, बोल्ट उडवू शकतो धमाका...