आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Glasgow Commonwealth Game News In Marathi, Indian Hockey Team

भारतीय संघाची वेल्सवर 3-1 ने मात ; रूपिंदरपाल, रघुनाथ यांचा प्रत्येकी एक गोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो- सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष हॉकी संघाने शुक्रवारी 20 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारतीय संघाने सलामी सामन्यात वेल्सचा 3-1 अशा फरकाने पराभव केला. याशिवाय भारताने अ गटात विजयाचे खाते उघडले. राष्ट्रकुलच्या हॉकी प्रकारात आता भारताच्या महिलांपाठोपाठ पुरुष संघानेही विजय मिळवून दमदार सुरुवात केली.
आर. व्ही. रघुनाथ (20 मि.), रूपिंदरपाल सिंग (42 मि.) आणि गुरविंदरसिंग चांडी (47 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून भारताला विजय मिळवून दिला. वेल्ससाठी आंद्रे कोर्निकने 23 व्या मिनिटाला गोल केला. वेल्सचा हा एकमेव गोल ठरला.

जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. दरम्यान, पाचव्या मिनिटाला पेनॉल्टी कॉॅर्नरवर भारताला गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र, रूपिंदरपाल सिंगलाही या संधीचे सोने करता आले नाही. मात्र, त्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत भारताने 1-0 ने आघाडी मिळवली. रघुनाथने 20 व्या मिनिटाला दुसर्‍यांंदा मिळालेल्या पेनॉल्टी कॉर्नरवर भारताकडून पहिल्या गोलची नोंद केली. दरम्यान, अवघ्या तीन मिनिटांत वेल्सने सामन्यात पुनरागमन केले. आंद्रेने 23 व्या मिनिटाला वेल्सला 1-1 ने बरोबरी मिळवून दिली होती.
गुरविंदरचे पुनरागमन
दुसर्‍या हाफमध्येही भारतीय संघाने आपला दबदबा कायम ठेवला. संघात दमदार पुनरागमन करणार्‍या गुरविंदर चांडीने भारताच्या विजयात एका गोलचे योगदान दिले. त्याने 47 व्या मिनिटाला गोल करून भारताचा विजय निश्चित केला.