आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचे राष्ट्रकुलमध्ये ‘लय भारी’ यश; संजिताला सुवर्णपदक तर मीराबाई रौप्यपदक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लास्गो- भारतीय संघाने गुरुवारी सलग पाच पदकांची लूट करून गुरुवारी 20 व्या राष्ट्रकुल स्पर्धेतील आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात केली. भारताने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सुवर्णपदकाचे खाते उघडले. त्यापाठोपाठ भारताने तीन रौप्य आणि एका कांस्यपदकाची कमाई केली. या सोनेरी यशासह भारतीय संघाने गुणतालिकेत तिसर्‍या स्थानावर धडक मारली.
ज्युडो प्रकारात थोऊडोमनने महिलाच्या 52 किलो वजन गटात भारताला कांस्यपदक मिळवून दिले. तिने कांस्यपदकाच्या लढतीत सी.लेघेंटीमला पराभूत केले. तिने तिसर्‍या स्थानी धडक मारली. भारताचे यंदाच्या स्पर्धेतील हे पहिलेच कांस्यपदक ठरले.

याच पदकांनी आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय संघातील खेळाडूंनी आपापल्या खेळ प्रकारांत विजयी सलामी दिली. रितू राणीच्या नेतृत्वाखाली भारताच्या महिला हॉकी संघाने सलामी सामन्यात कॅनडाचा 4-2 अशा फरकाने पराभव केला.

नवज्योतचा पराभव : पुरुषांच्या 60 किलो वजन गटाच्या अंतिम सामन्यात भारताच्या नवज्योत चानाला पराभवाचा सामना करावा लागला. त्याला इंग्लंडच्या अ‍ॅश्ले मॅकेझिनने पराभूत केले. या पराभवासह नवज्योतला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे विजयासह इंग्लंडच्या खेळाडुने सुवर्णपदकावर नाव कोरले.स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी वेटलिफ्टिंगच्या 48 किलो वजन गटात संजिता खुमुकचम संजिता चानूने सुवर्णपदक पटकावले. याच गटात मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकले. तसेच ज्युदोमध्ये नवज्योत आणि सुशीलाने रौप्यपदक आपल्या नावे केले.

भारतीय ज्युदोपटूंनी 20 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी शानदार सुरुवात केली. स्कॉटिश एक्झिबिशन कॉन्फरन्स सेंटर (एसईसीसी) येथे झालेल्या सामन्यात सुशीला लिम्माबाम आणि नवज्योत चाना यांनी आपापल्या गटात फायनलमध्ये प्रवेश केला होता.

सोनेरी यश
भारताच्या 20 वर्षीय संजिता चानूने महिलांच्या 48 किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले. तिने एकूण 173 किलो वजन उचलून हे सोनेरी यश संपादन केले. यात 77 आणि 96 किलो वजनाचा समावेश आहे.

मीरा चमकली
संजितापाठोपाठ 48 किलो वजन गटात मीराबाईनेही पदकाचा कित्ता गिरवला. तिने याच गटात भारताला रौप्यपदक मिळवून दिले. तिने एकूण 173 किलो वजन उचलून दुसरे स्थान पटकावले.

राष्ट्रकुल स्पर्धेत तिरंग्याचा अवमान
राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय तिरंग्याचा अवमान झाला. राष्ट्रकुल स्पर्धेतील एका गाण्याच्या ध्वनिचित्रफितीत तिरंगा उलटा धरल्याचे दिसून आले. लेट द गेम्स बिगिन या गाण्यात तीन जण तिरंगा घेऊन उभे होते. यात झेंड्याचा हिरवा पट्टा वरच्या बाजूला, तर केशरी पट्टा खालच्या बाजूला होता. स्पर्धा अधिकार्‍यांकडून तिरंग्याचा अवमान झाल्याने सोशल मीडियावर संतापाच्या प्रतिक्रिया उमटल्या.

भारताच्या प्रकाशचे स्वप्न ‘पाण्यात’
भारतीय जलतरणपटू साजन प्रकाशचे राष्ट्रकुल स्पर्धेच्या मुख्य फेरीत
खेळण्याचे स्वप्न पाण्यात गेले. तो पुरुषांच्या 400 मीटर फ्रीस्टाइल प्रकाराच्या पात्रता फेरीत पूर्णपणे अपयशी ठरला. पात्रता फेरीत त्याने 3:59.29 सेकंदांत निश्चित अंतर पूर्ण केले.

सचिन, सचिन... नावाचा स्टेडियमवर जयघोष
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान युनिसेफच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर इवान मॅकग्रिगोर यांनी समाजातील गरीब आणि गरजू मुलांसाठी कार्य करणार्‍या भारतरत्न सचिनच्या नावाची घोषणा केली. याच वेळी भारताच्या चाहत्यांनी सचिन, सचिन... असा मास्टर ब्लास्टरच्या नावाचा जयघोष करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.