नवी दिल्ली - तब्बल १६ वर्षांनंतर आशियाई चॅम्पियनशिपमध्ये इंडियन हॉकी सुवर्णमय झाली. भारताने दीड दशकाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर इंचियोन आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. गत १९९८ नंतर भारताने ही गोल्डन कामगिरी केली. यासह भारतीय संघाने वर्षभरातील अपयशाची कसर भरून काढली. सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली भारताने हे सोनेरी यश संपादन केले. तसेच त्याने आशियाई स्पर्धेत भारतीय हॉकीला विजयी ट्रॅकवर आणले. यासह भारताच्या हॉकी संघाला सोनेरी दिवस मिळाले. आता हे सोनेरी यश भविष्यात कायम ठेवण्याचा हॉकी टीमचा प्रयत्न असेल. मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्शच्या राजीनामा नाट्यालाही भारतीय संघाला सामोरे जावे लागले.
रिओ ऑलिम्पिकचे तिकीट
आशियाई स्पर्धेतील सोनेरी यशाच्या बळावर भारतीय हॉकी संघाने आगामी २०१६ रिओ ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळवले. ही स्पर्धा ब्राझीलमध्ये होणार आहे. आठ वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन भारतीय संघ ब्राझीलमध्येही हॉकीतील
आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल. सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ चमकदार कामगिरी करत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत निराशा
आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदकाने आत्मविश्वास द्विगुणित झालेल्या भारतीय संघाला घरच्या मैदानावर चॅम्पियन्स ट्रॉफीत आपला लय कायम ठेवता आली नाही. यजमानांना निराशाजनक कामगिरीचा मोठा फटका बसला. त्यामुळे भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची चांदी
ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय संघाची चांदी झाली. सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली भारताने या स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. रूपिंदर पाल सिंग, कोथजित आणि मनप्रीत सिंग यांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या बळावर भारताने रौप्यपदक पटकावले. अंतिम सामन्यातील पराभवाने भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सुवर्णपदकावर नाव कोरले. तसेच इंग्लंडचा संघ कांस्यपदकाचा मानकरी ठरला.