आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप 2014 ला: सानियासाठी फलदायी; इतरांसाठी संघर्षाचे वर्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सानिया मिर्झाने वर्षभरात दुहेरीची तीन विजेतेपदे पटकावत तिची वर्षभरातील विजयी लय कायम ठेवली. मात्र, भारताच्या प्रख्यात टेनिसपटूंना मावळत्या वर्षात फारशी छाप पाडता आली नाही. सरते २०१४ हे वर्ष भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झासाठी चांगलेच फलदायी ठरले.

सानियाने वर्षभरात जिंकलेली यूएस ओपन सर्वाधिक विशेष ठरली. ती प्रथमच ब्रुनो सोरेसबरोबर स्पर्धा जिंकली. त्याआधीच तिच्याकडे ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपनचे किताब आहेत. सातत्यपूर्ण कामगिरीसह सानियाने मावळत्या वर्षात सात डब्ल्यूटीए स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यातील तीन स्पर्धांची विजेतेपदे तिने झिम्बाब्वेची सहकारी खेळाडू कारा ब्लॅकसह पटकावली आहेत.

विजय तेलंगणाला अर्पण
तेलंगण या नवीन राज्याच्या निर्मितीनंतर तिला त्या राज्याची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. तो वाद वाढवण्यापेक्षा तिने थेट यूएस ओपनचे विजेतेपदच तेलंगण राज्याला अर्पण करत त्या वादाला चोख प्रत्युत्तर दिले होते. आशियाईमध्ये खेळण्यातून नाव माघारी घेतल्यानंतरही वाद निर्माण झाला होता; परंतु नंतर डब्ल्यूटीएच्या अंतिम फेरीत खेळण्याची शाश्वती मिळाल्यानंतर तिने साकेत मिनयीबरोबर मिश्र दुहेरीत सुवर्ण, तर प्रार्थना ठोंबरेबरोबर कांस्य पटकावले. वर्षभर सानियाची कामगिरी प्रभावी ठरली.

पुरुष खेळाडूंसाठी वर्ष अपयशी
भारताच्या पुरुष खेळाडूंसाठी मावळते वर्ष अपयशी ठरले आहे. एकेरीतील स्टार सोमदेव देवबर्मनसह दुहेरीतील लिएंडर पेस आणि रोहन बोपन्ना यांनादेखील हे वर्ष अपयशीच ठरले. पेसने वर्षभरात केवळ एकाच स्पर्धेचे विजेतेपद पटकावले असून वर्षाच्या प्रारंभी पहिल्या दहात असलेले मानांकन आता २९ व्या स्थानापर्यंत घसरले आहे. बोपन्नाचे वर्षारंभीचे मानांकन १३ वरून घसरत ३० पर्यंत आले आहे.

यशस्वी ठरले वर्ष : सरत्या २०१४ या वर्षांत सानिया मिर्झाने दुहेरीचे ३ विजेतेपद पटकावले.