आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Munde Challenges Sharad Pawar For MCA Chairman Post Election

खेळातील राजकीय आखाडा:गोपीनाथ मुंडेंचे एमसीए अध्यक्षपदासाठी शरद पवारांना आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - येत्या 18 ऑक्टोबर रोजी होणा-या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या द्वैवार्षिक निवडणुकीत आत्ता कुठे रंग भरायला लागला आहे. आज भाजपच्या गोपीनाथ मुंडे यांनी अध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून अर्ज भरून आपले राजकीय प्रतिस्पर्धी शरद पवार यांना क्रिकेटच्या मैदानावर आव्हान दिले आहे.


मुंडे यांनी मंगळवारी दुपारी वानखेडे स्टेडियममध्ये आपले समर्थक राज पुरोहित आणि रवी सावंत यांच्या पॅनलचे एक उमेदवार आशिष शेलार यांच्यासमवेत जाऊन अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. आशिष शेलार यांनी मुंडे यांच्या उमेदवारीला अनुमोदन दिले आहे.


मुंडे यांनी याआधीच स्टायलो क्रिकेट क्लबचे मतदार व प्रतिनिधी म्हणून अर्ज दाखल केला होता. मुंडे यांच्याप्रमाणे अन्य 14 राजकीय नेतेमंडळींनीही विविध क्लबचे मतदार म्हणून अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांचादेखील समावेश आहे. शिवसेना, मनसे, भाजप, राष्ट्रवादी या सर्व पक्षांनी आपापले मतदार प्रतिनिधी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत उतरवले आहेत. यापैकी आणखी किती जण निवडणुकीच्या आखाड्यात प्रत्यक्ष उतरतात, ते येत्या दोन दिवसांतच स्पष्ट होईल. 11 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 13 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येईल.


मुख्यमंत्री चव्हाण उत्सुक!
मुबंई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आता अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी सहभाग घेतला आहे. या पदासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणदेखील उत्सुक आहेत. यामुळे ते एमसीएच्या अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. यामधून या पदाच्या निवडणुकीला आता चांगलाच रंग येण्याची चर्चा आहे.


गोपीनाथ मुंडे वि. शरद पवार सामना रंगणार
गोपीनाथ मुंडे यांनी अध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्यामुळे उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे. शरद पवार हे तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरतात का, हे जाणून घेण्यासाठी काही जण प्रयत्न करीत आहेत. शरद पवार बिनविरोध येऊ नयेत यासाठी सारा खटाटोप सुरू आहे.


आठवलेंची संधी हुकली
राजकीय पक्षांच्या या रणधुमाळीमध्ये रिपब्लिकन पार्टीच्या रामदास आठवले यांची बस मात्र थोडक्यात हुकली. त्यांनीही आपला प्रतिनिधित्व अर्ज दाखल केला होता. मात्र अर्ज दाखल करण्यास विलंब झाल्यामुळे त्यांना या वेळच्या निवडणुकीमध्ये उतरता येणार नाही.


18 ऑक्टोबरला एमसीएची द्वैवार्षिक निवडणूक
राजकीय नेते निवडणुकीच्या रिंगणात
ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत
ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल