आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Says It Can't Provide IPL Security During Polls News In Marathi

आयपीएलचे आफ्रिकेतील आयोजन धोक्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतातील निवडणुकांच्या कालावधीत आयपीएलला सुरक्षा व्यवस्था देता येणार नाही, असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केल्यानंतर बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेचा पर्याय प्रथम क्रमांकावर ठेवला होता. तेथील क्रिकेटविषयक सोयीसुविधा, आंतरराष्ट्रीय दळणवळणाच्या सोयी आणि सुरक्षा व्यवस्था यामुळे दक्षिण आफ्रिकेला बीसीसीआयने प्रथम पसंती दिली होती. बीसीसीआयच्या या प्रथम पसंतीच्या पर्यायालाही धक्का बसला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील सर्व क्रिकेट स्टेडियम्स, केंद्रे आणि मैदानांशी कोकाकोला कंपनीने जाहिरातींचे करार केले आहेत. आयपीएल ही स्पर्धा ‘पेप्सी’ने पुरस्कृत केली आहे. म्हणजेच पेप्सी आयपीएल या नावानेच यंदा ही स्पर्धा होणार आहे. कोकाकोला आणि पेप्सी या दोन्ही कंपन्या शीतपेय उत्पादनातील अग्रेसर कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्यांमध्ये जागतिक पातळीवर प्रचंड स्पर्धा आहे. त्यामुळे कोकाकोला आणि पेप्सी यांच्यात आयपीएल सामन्यांचा आयोजनासंदर्भात सामंजस्य होईल याची सुतरामही शक्यता नाही. देशांतर्गत निवडणुकांच्या तारखांच्या घोषणेची प्रतीक्षा राजकीय पक्षांइतकीच सध्या बीसीसीआयलाही आहे. या तारखा निश्चित झाल्यानंतर परदेशात कोणत्या तारखांपासून आयपीएल स्पर्धा आयोजित करायच्या आणि भारतात कोणत्या तारखांपासून व कोणत्या ‘स्टेज’पासूनच्या स्पर्धा घ्यायच्या याबाबतीत निर्णय बीसीसीआयला घ्यायचा आहे. बीसीसीआयने यापूर्वीच परदेशातील स्पर्धा आयोजनासाठी दक्षिण आफ्रिकेची निवड केली होती. मात्र, कोकाकोला- पेप्सी युद्धाची झळ यंदाच्या आयपीएल आयोजनाला बसण्याची शक्यता आहे.

तो संघर्ष टाळण्यासाठी बीसीसीआयने पुन्हा एकदा बांगलादेश आणि संयुक्त अरब अमिराती या दोन पर्यायांचा विचार करायला सुरुवात केली आहे. बांगलादेशात सध्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेनंतर आयसीसी ट्वेन्टी-20 विश्वचषक होणार आहे. त्यामुळे त्यानंतर तेथे आयपीएल आयोजनात किती रस राहील, ते सांगणे कठीण आहे.

आयोजनाची डोकेदुखी
संयुक्त अरब अमिरातीबाबतची समस्या वेगळी आहे. निकाल निश्चितीमुळे तेथील केंद्रांबाबत केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केली होती. सुरक्षा व्यवस्था हीदेखील तेथील समस्या असेल. श्रीलंकेतील पावसाळी हवामान, स्थानिक क्रिकेट आणि तामिळ-सिंहली वाद यामुळे आयपीएल केंद्र म्हणून त्यांचा सर्वात शेवटी विचार करण्यात येईल. मात्र, सध्यातरी बीसीसीआयच्या दक्षिण आफ्रिकेतील आयपीएल आयोजनाला ‘कोकाकोला’ने रोखले आहे एवढे निश्चित.

गुरुवारी महत्त्वाची बैठक
बीसीसीआयचे पदाधिकारी सध्या काळजीत पडले आहेत. येत्या 27 व 28 तारखेला भुवनेश्वर येथे आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची तसेच बीसीसीआयच्या कार्यकारी समितीची बैठक होणार आहे. त्या बैठकीत आयपीएलच्या आयोजनाच्या आगामी व्यवस्थेबाबत विचारविनिमय होणार आहे.