आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा जगतात सर्वश्रेष्ठ खेळाडू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटच्या विश्वात भारतीय संघाचा सचिन तेंडुलकर हा महान खेळाडू आहे. त्याने केलेल्या अपूर्व कामगिरीमुळे क्रिकेटला एक नवी ओळख मिळाली आहे. त्याच्या विक्रमांमुळे क्रिकेटने एक उंची गाठली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इतक्या उच्च गुणवत्तेचा खेळ सातत्याने करत राहणे, ही खेळाडूच्या जीवनातील महाकठीण गोष्ट आहे. मात्र, हे शिवधनुष्य सचिनने यशस्वीपणे पेलेले आणि 24 वर्षे आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटवर अधिराज्य गाजवले.
सचिनने क्रिकेटच्या आपल्या साधनेत कोणत्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही. प्रचंड इच्छाशक्ती, मेहनत आणि लक्ष्य गाठण्याची तळमळ, यामधून त्याने आपले वर्चस्व अबाधित ठेवताना अनेक मैलांचा प्रवास यशस्वीपणे पार केला. दरम्यान, प्रत्येक मैलावर त्याने अनेक विक्रम नोंदवले. याच वेगळेपणामुळे तो आजच्या घडीला सर्वांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. आम्ही वेगवेगळे खेळ खेळत असलो तरी सचिनला क्रिकेटशिवाय इतरही अनेक खेळांविषयी आस्था आहे. त्यामुळेत तो रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोवाक योकोविकसारख्या दिग्गज खेळाडूंच्या सामन्याला आवर्जून हजेरी लावतो. त्याने केवळ आपले क्रीडाप्रेम टेनिसपुरतेच मर्यादित ठेवले असे नाही. फॉर्म्युला-1, बॅडमिंटन आणि फुटबॉलविषयी त्याला आदर आहे. यामुळेच प्रत्येक खेळातले बारकावेही त्याला माहीत आहेत. कदाचित याच कौशल्यामुळे त्याचे क्रीडाविश्वात व्यक्तिमत्त्व वेगळे आहे. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात कुठला तरी एक क्षण निवृत्तीचा येतोच आणि तो अवघड असतो, याची मला कल्पना आहे. सचिननेदेखील निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. तो घेताना त्याची मन:स्थिती काय असेल, याची मी कल्पना करू शकतो. सचिनच्या निवृत्तीनंतरही धुव्रता-याचे स्थान अढळ असेल !!
शब्दांकन: एकनाथ पाठ