आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gurunath Meiyappan Guilty In IPL Spot Fixing Case, IPL News In Marathi

श्रीनिवासन यांचे जावई मयप्पन \'स्पॉट फिक्सर\', शिल्पा - राज कुंद्राच्या स्वतंत्र चौकशीची गरज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी नेमलेल्या चौकशी आयोगाने बीसीसीआयचे प्रमुख एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांच्यावरील आरोपात तथ्य असल्याचे अहवालात म्हटले आहे.
माजी न्यायाधीश मुकुल मुदगल यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय चौकशी समितीने चेन्नई सुपरकिंग्जशी संबंधीत गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे मालक राज कुंद्रा यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी केली आणि त्याचा अहवाल आज (सोमवार) सुप्रीम कोर्टात सादर केला आहे. तब्बल 4000 पानांच्या या अहवालात मयप्पन संघांशी संबंधीत माहिती सट्टेबाजांना देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, राज कुंद्राच्या सहभागाची स्वतंत्र आणि सविस्तर चौकशी करण्याची गरज असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
मुदगल समितीचा अहवाल चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघावर परिणाम करणारा आहे. या अहवालाने मयप्पन आणि कुंद्रा यांच्यावर ठपका ठेवला असून ते यात दोषी आढळले तर दोन्ही संघांना आयपीएलमधून बाहेर काढले जाईल.
माजी न्यायाधीश मुदगल समितीने मयप्पनचा स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट केले आहे. खेळाडू, पत्रकार आणि आयपीएलच्या अधिका-यांच्या जबाबावर आधारित या अहवालात राजस्थान रॉयल्स टीमचे मालक राज कुंद्रा यांची सखोल चौकशी गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
विशेष म्हणजे, 2013 मध्ये झालेल्या आयपीएल-6 दरम्यान राजस्थान टीमच्या खेळाडूंनी स्पॉट फिक्सिंग केल्याचे उघड झाले होते. तपासात चेन्नई सुपरकिंग्जचे अधिकारी आणि बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन याचेही नाव समोर आले होते. ऑक्टोबर 2013 मध्ये या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने चौकशी समिती नेमली होती.
चौकशी समितीने मयप्पनची सखोल चौकशी केली. मयप्पनचे नाव स्पॉट फिक्सिंगमध्ये आल्यानतंर चेन्नई सुपरकिंग्जने संघाशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते. मात्र संघाशी त्याचा असलेला संबंध जगजाहीर होता.
चौकशी समितीने मयप्पनवर ठपका ठेवल्यानंतही 12 फेब्रुवारी रोजी होणा-या खेळाडूंच्या लिलावावर सु्प्रीम कोर्टाने बंदी घातलेली नाही. या चौकशी अहवालामुळे खेळाडूंच्या लिलावाला स्थिगिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

चौकशी समितीने भारतीय क्रिकेटची प्रतिमा उंचावण्यासाठी दहा शिफारशी केल्या आहेत. त्यात नव्या आणि तरुण खेळाडूंना फिक्सिंगपासून दूर ठेवण्यासाठी माजी खेळाडूंनी त्यांना मार्गदर्शन करण्याचा सल्ला समितीने दिला आहे.