आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फिरकीपटू हरभजनला मिळाली नवसंजीवनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएल-८ आता समाप्तीकडे आहे. सालाबादाप्रमाणे यंदाही आयपीएलमध्ये अनेक नाटकीय घटना रंगल्या. स्पर्धेने अनेक उगवत्या तार्‍यांना व्यासपीठ दिले, तर वरिष्ठांना आपल्यातील कर्तबगारी दाखवण्याची संधी दिली. फिरकीपटू हरभजनसिंगचेच उदाहरण घ्या. बांगलादेश दौर्‍यासाठी त्याची निवड अनपेक्षित म्हटली पाहिजे. या निवडीमागची कारणे, निकष काय आहेत? यामागे भविष्यातील काही योजना आहे की केवळ संधी देण्याची औपचारिकता? आयपीएलच्या गेल्या काही हंगामांतून युसूफ पठाण, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि मोहित शर्माला आंतरराष्ट्रीय द्वार खुले झाले.

आयपीएलमध्ये वरिष्ठ तसेच माजी खेळाडूंनीही शानदार प्रदर्शन केले आहे. यंदा आशिष नेहराचे नाव घेता येईल. त्याने आतापर्यंत २२ गडी बाद केले आहेत. त्याची दिशा आणि टप्पा योग्य आहे. मात्र बांगलादेश दौर्‍यासाठी त्याचा विचार झाला नाही. याच निवड समितीने हरभजनला दोन वर्षांपूर्वी बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता असे काय घडले की सर्वांनीच भज्जीच्या नावावर मोहोर उमटवली. विशेष म्हणजे त्याची निवड कसोटीसाठी झाली आहे.

हरभजनने मात्र मर्यादित षटकांच्या सामन्यात चमक दाखवली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती. चार-पाच वर्षांपूर्वी मात्र निर्विवादपणे तो देशातील अव्वल गोलंदाज होता. मात्र वर्तमान निवडीत हा निकष कसा ठरतो? एका निवडकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, हरभजन एकाही निवडकर्त्याच्या मर्जीतून कधी उतरला नव्हता. त्यांना फक्त त्याच्या निवडीचे एक कारण हवे होते. जेणेकरून त्याचे पुनरागमन होऊ शकेल. शेवटी कसोटी कर्णधार विराट कोहलीने हा मार्ग सुकर केला. हरभजनने आयपीएल-८ मध्ये १४ सामन्यात १६ बळी घेतले आहेत. हे फार चांगले नसले तरी खूप वाईट प्रदर्शननही नाही. विरोधी संघाचा दबाव झुगारण्याकामी भज्जी धावून आला.

चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध त्याने लागोपाठ चेंडूंवर रैना आणि धोनीची विकेट काढली. तो उत्तम प्रकारे उसळते चेंडू फेकत आहे. तो लयीत आहे. भज्जीच्या अनुभवाचा फायदा घेण्याचा विराटचा विचार असावा. हरभजनचे कौतुक करताना रवी शास्त्री म्हणाला की, त्याने आयपीएलमध्येही कसोटीसारखीच संथ गोलंदाजी केली. या डावपेचांमुळे फलंदाजांनी चुका केल्या. शास्त्री म्हणाला की हरभजन आधी वेगात व सरळ गोलंदाजी करायचा. मात्र आता तो संथ गोलंदाजीतही तरबेज झाला आहे. शास्त्रीच्या म्हणण्यानुसार परदेशी खेळपट्ट्यांवर इतरांनी निराश केल्यामुळे हरभजनला संधी मिळाली. तो ३४ वर्षांचा आहे. फिरकीपटू एस.वेंकटराघवनने तर ३८ वर्षांपर्यंत मैदान गाजवले. तात्पर्य हे की भज्जी आणखी २-३ वर्षे खेळू शकतो. मिळालेल्या संजीवनीचा लाभ घेऊन भारताला जास्तीत जास्त बळी त्याने मिळवून द्यावेत. हे न जमल्यास बांगलादेश दौर्‍यानंतर तो पुन्हा विस्मरणात जाऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...