औरंगाबाद - मागील १२ वर्षांपर्यंत केलेल्या प्रचंड मेहनतीच्या बळावर मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. जिद्द आणि आत्मविश्वासाने केलेल्या तपश्चर्येला सुवर्णपदकाची झळाळी मिळाली, हाच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे, असे आनंदोद्गार सांगलीचा कबड्डीपटू नितीन मदनेने काढले. तळागाळातील युवा खेळाडूंना भारतीय संघातील
आपले स्थान निश्चित करण्याची मोठी संधी आहे, असेही त्याने दैनिक ‘दिव्य मराठी’शी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले.
त्याने सलग सातव्यांदा सुवर्णपदक मिळवणा-या भारतीय कबड्डी संघाचे इंचियोन येथील आशियाई स्पर्धेत प्रतिनिधित्व केले.
कमीपणाचा न्यूनगंड दूर करा
ग्रामीण भागात सर्वोत्कृष्ट कबड्डीपटू आहेत. मात्र, या खेळाडूंना योग्य ते व्यासपीठ मिळत नाही. यातून या खेळाडूंमधील कौशल्य समोर येत नाही. तसेच या खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात कमीपणाचा न्यूनगंड निर्माण झालेला आहे. स्वत:ला कमी लेखण्याचा अवगुण दूर केल्यास ग्रामीण भागातील कबड्डीपटू वर्ल्डकपमध्येही आपला दबदबा निर्माण करतील, असा विश्वास नितीनने व्यक्त केला. नवोदित खेळाडूंसाठी भविष्यात कबड्डी स्पर्धांमध्ये अनेक संधी निर्माण होणार आहेत. यात केवळ स्वत:ला सिद्ध करण्याची तयारी ठेवा, असा सल्लाही त्याने युवा खेळाडूंना दिला.
मूर्ती लहान, कीर्ती महान
आशियाई स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय कबड्डी संघात सांगलीचा नितीन हा सर्वात लहान खेळाडू होता. मूर्ती लहान पण कीर्ती महान, या साधुक्तीप्रमाणेच त्याने भारतीय संघासाठी मोलाची कामगिरी केली. या वेळी त्याने इराणविरुद्ध अंतिम सामन्यात उत्कृष्ट चढाईच्या बळावर एका गुणांची कमाई केली. यासह त्याने भारताच्या विजयात योगदान दिले.
या संघाविरुद्ध दिली झुंज
पहिला सामना
मलेशिया
दुसरा सामना थायलंड
तिसरा सामना
द.कोरिया
चौथा सामना इराण
महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू
नितीन मदने हा आशियाई स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारा महाराष्ट्राचा एकमेव कबड्डीपटू ठरला. त्याने गत वर्षी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. यातून त्याला दक्षिण कोरियातील स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली.