आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृपया, मला संघातून वगळू नका : हॅरिसची विनंती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅडिलेड - चौथ्या कसोटीसाठी संघातील आपले स्थान कायम ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज रेयान हॅरिसने संघ व्यवस्थापनाला विनंती केली आहे. अ‍ॅडलेड येथे चौथ्या कसोटीला येत्या 24 जानेवारीपासून प्रारंभ होणार असून या सामन्यात फिरकीपटू नॅथन लॉयनला स्थान देण्यासाठी एका वेगवान गोलंदाजाला संघाबाहेर जावे लागू शकते.
नॅथन लॉयनला संघात स्थान मिळू शकते, हे वृत्त कानी येताच रेयान हॅरिसने व्यवस्थापनाला आपणाला संघाबाहेर न करण्याची विनंती केली. पीटर सिडलने चौथ्या कसोटीसाठी ब्रेक घेण्यास नकार दिला आहे. बेन हिल्फेनहॉस जबरदस्त फॉर्मात असून त्याला संघाबाहेर करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. यामुळे रेयान हॅरिस किंवा मिशेल स्टार्क या दोघांपैकी एकाला संघाबाहेर जावे लागेल. हॅरिसनेसुद्धा दुखापतीतून सावरल्यानंतर चार महिन्यांच्या कालावधीने संघात पुनरागमन केले.
‘मी पर्थ कसोटीत चांगली कामगिरी केली. मी खूप षटके गोलंदाजी केली. त्या वेळी माझ्या खांद्यात वेदना झाल्या नाहीत. मी पूर्ण फिट आहे. वारंवार जखमी होणार नाही हे मी निवड समितीला सांगू इच्छितो. पीटर सिडलला ब्रेक नकोय. यामुळे भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी जोरदार स्पर्धा वाढली आहे. एक तर मला किंवा स्टार्कला संघाबाहेर केले जाईल. मला पुढच्या सामन्यातही खेळायचे आहे. आम्ही ही मालिका 4-0 ने जिंकण्यासाठी आतुर आहोत,’ असेही या वेळी रेयान हॅरिसने सांगितले.
‘मला जर चौथ्या कसोटीसाठी संघात निवडण्यात आले नाही तर किमान पुढचे तीन ते चार महिने क्रिकेटपासून दूर जावे लागेल. वारंवार पुनरागमन करणे सोपे नसते,’ असेही तो म्हणाला.