आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉकी संघाचे कोच मायकेल नोब्ज यांची हकालपट्टी, सुमार कामगिरीमुळे कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हॉलंडमधील एफआयएच वर्ल्ड हॉकी लीग राउंड-3 मधील भारतीय संघाच्या सुमार कामगिरीचा परिणाम प्रशिक्षक मायकेल नोब्ज यांना भोगावा लागला. त्यांची प्रशिक्षकपदावरून हॉकी इंडियाने हकालपट्टी केली. जून 2011 मध्ये नोब्ज यांची राष्‍ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. आगामी 2016 रिओ ऑलिम्पिकपर्यंत हा करार होता.


भारतीय पुरुष संघ हॉलंडमधील आठ देशांच्या हॉकी स्पर्धेत सातव्या स्थानी राहिला आणि 2014 मध्ये होणा-या विश्वचषकासाठी थेट प्रवेश निश्चित करू शकला नाही. नोब्ज यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने फेबु्रवारीत दिल्लीत झालेल्या वर्ल्ड लीग राउंड-2 मध्ये विजय मिळवला होता. मात्र, राउंड-3 मध्ये भारतीय संघाला अव्वल टीमविरुद्ध लढतीत पराभवाचा सामना करावा लागला.


‘हॉकी इंडिया किंवा स्पोटर्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने माझी प्रशिक्षक पदावरुन हकालपट्टी केली नाही. मी स्वत:हून प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय हा मी घेतलेला आहे. माझी हकालपट्टी झाल्याचे वृत्त चुकिचे आहे, अशी प्रतिक्रिया मायकेल नोब्स यांनी दिली.


ओल्टमसकडे जबाबदारी
आशियाई चषकाच्या तयारीसाठी 16 जुलैपासून बंगळुरू येथे भारतीय संघाचे प्रशिक्षण शिबिर सुरू होणार आहे. हॉकी इंडियाचे उच्च्स्तरीय व्यवस्थापक रालेंट ओल्टमस यांच्याकडे प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली. विश्वचषकातील प्रवेश निश्चित करण्यासाठी भारताला आशियाई चषकात विजय मिळवणे आवश्यक आहे. या स्पर्धेसाठी भारताच्या संभाव्य हॉकी संघाची घोषणा करण्यात आली आहे.


भारतीय संघ सातव्या स्थानी
भारताला विश्वचषक हॉकी स्पर्धेत थेट प्रवेश मिळवण्यासाठी अव्वल तीन संघांमध्ये स्थान मिळवणे आवश्यक होते. मात्र, सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. माजी हॉकीपटूंनी या कामगिरीस प्रशिक्षक नोब्ज यांना जबाबदार धरले. त्यांना निरोप देण्याची वेळ आली असल्याचे मत परगट सिंग यांनी व्यक्त केले होते.


24 ऑगस्टपासून आशियाई चषक हॉकी
बंगळुरू येथे भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षण शिबिर होणार आहे. 16 जुलै ते 16 ऑगस्टदरम्यान हे शिबिर चालणार आहे. येत्या 24 ऑगस्टपासून आशियाई चषक हॉकी स्पर्धेला प्रारंभ होईल. ही स्पर्धा 24 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान मलेशियात होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेच्या ब गटात आहे. या गटात कोरिया, बांगलादेश आणि ओमानचा समावेश आहे. तसेच ब गटात मलेशिया, पाकिस्तान, जपान व चीन संघ सहभागी आहेत.