आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Home Minister Sushilkumar Shinde Says, This Year IPL Will Play Outside India Due To Election

यंदाची आयपीएल देशाबाहेर, निवडणुकीमुळे सुरक्षा पुरवणे शक्य नाही- सुशीलकुमार शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- यंदाची आयपीएल स्पर्धा भारतात भरविता येणार नाही. लोकसभा निवडणुका आणि आयपीएलच्या तारखा एप्रिल व मे महिन्यात असल्याने या स्पर्धेला सुरक्षा पुरविणे सरकारला शक्य होणार नाही, असे केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.
बीसीसीआयने यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी गृहमंत्रालय सुरक्षा देऊ शकते काय याची चाचपणी केली होती. मात्र, गृहमंत्रालयाने ही स्पर्धा बाहेरच्या देशातच खेळविली जावी, असे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल 2009 प्रमाणे परदेशात होण्याची शक्यता आहे. 2009 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमुळे दक्षिण आफ्रिकेत स्पर्धा भरविण्यात आली होती. यंदाही बीसीसीआय ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेसह श्रीलंका, बांगलादेश आणि दुबईत स्पर्धा खेळविण्याचा विचार करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत बोलणी सुरु असून, येत्या आठवड्याभरात स्पर्धा कोठे खेळविण्यात येणार याचा अंतिम निर्णय होईल असे आयपीएलचे कमिशनर रणजीब बिस्वाल यांनी म्हटले आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेचा पर्याय सर्वप्रथम बाद होणार आहे. बीसीसीआय आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड यांचे सध्या चांगले संबंध नाहीत. सीईओ लॉरगॅट यांच्या नियुक्तीपासून हे संबंध बिघडले, ते अजूनही तसेच आहेत. दक्षिण आफ्रिकेचा पर्याय टेलिव्हिजन कंपन्यांना नको आहे. कारण दक्षिण आफ्रिकेत स्पर्धा घेतल्यास थेट प्रक्षेपणाच्या वेळा भारतीय प्रेक्षकांना व टेलिव्हिजन पाहणा-यांना अडचणीच्या वाटतात. हाच प्रश्न संयुक्त अरब अमिरातीमधील वेळांच्या बाबतीतही निर्माण होणार आहे. त्यामुळे भारतीय वेळेप्रमाणेच अर्ध्या तासाचा फरक असणा-या श्रीलंका किंवा बांगलादेश या दोन पर्यायांचा प्राधान्याने विचार होऊ शकतो.
बांगलादेशातील अस्थिर राजकीय परिस्थिती हा अडचणीचा मुद्दा पुढे येऊ शकतो. मात्र, आयपीएल स्पर्धेआधी तेथे ट्वेन्टी-20 विश्वचषक व आशिया कप क्रिकेट स्पर्धाही होणार आहेत. त्या स्पर्धेच्या निमित्ताने बांगलादेशातील सर्व अडचणींचे मुद्दे आणि प्रश्नांची उत्तरेही मिळणार आहे.
बांगलादेशात सर्वात कमी खर्चात स्पर्धा होईल तसेच दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे तेथे क्रिकेट सामन्यांच्या आयोजनासाठीची सर्व व्यवस्था सज्ज असेल, असाही अंदाज आहे.
निवडणुकीनंतर स्पर्धेचा विचार!
सरकारने बीसीसीआयला निवडणुकांमुळे क्रिकेटसाठी सुरक्षा देऊ शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. देशातील निवडणुका 10 एप्रिल ते 10 मे या कालावधीत होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे निवडणुकांनंतर स्पर्धा देशातच आयोजित करता येईल का, या पर्यायाचाही बीसीसीआय विचार करत आहे. मात्र जूनमध्ये भारतात पावसाला सुरुवात होते त्यामुळे हा विषयही मागे पडल्याचे सांगण्यात येत आहे.