आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौप्यस्फोट: खचलेल्या सचिन तेंडुलकरला घ्यायची होती निवृत्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - क्रिकेटचा आधुनिक देव असे नामाभिधान मिळालेला सचिन तेंडुलकर कर्णधारपदी असताना संघाच्या अपयशामुळे भयभीत व पार खचून गेला होता. इतकेच नव्हे तर खेळण्यापेक्षा आता निवृत्ती घेतलेली बरी, असा विचारही तेव्हा त्याच्या मनात तरळत होता.

गतवर्षी क्रिकेटला अलविदा करणा-या सचिन तेंडुलकरच्या "प्लेइंग इट माय वे' या आत्मचरित्राचे येत्या ६ नोव्हेंबर रोजी जगभरात प्रकाशन केले जाणार आहे. त्यात त्याने आपल्या अडीच दशकांपेक्षा प्रदीर्घ कारकीर्दीतील अनेक महत्त्वपूर्ण क्षणांना उजाळा दिला आहे. कर्णधार म्हणून आलेल्या अपयशावरही सचिन मनमोकळेपणाने बोलला आहे.

पुस्तकातील एका उता-यात सचिन म्हणतो, मला पराभवाचा तिटकारा आहे. कर्णधार म्हणून संघाच्या ढिसाळ कामगिरीसाठीमी स्वत:ला जबाबदार ठरवत होतो. मात्र त्यापेक्षाही अधिक काळजी 'यातून बाहेर कसे पडावे तरी कसे' याची होती. कारण मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करत होतो.
मी अंजलीला म्हणालो, सातत्याने पदरात पडणा-या पराभवाच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी कदाचित काहीही करू शकत नाही, अशी भीती वाटते आहे. सलग अनेक लढती थोडक्याने गमावल्यामुळे मी भयभीत झालो होतो. मी माझे सर्वस्व ओतले होते, मात्र त्यापुढे ०.१ टक्केही योगदान येता येणार की नाही, याबद्दल मी साशंक होतो.

प्रख्यात क्रीडा पत्रकार व इतिहासकार बोरिया मुजूमदार यांचे सहलेखन असलेल्या या आत्मकथेत सचिनने बरेच काही खुलासेही केले. तो पुढे लिहितो, यामुळे मला प्रचंड मनोवेदना होत होत्या. या अपयशातून बाहेर पडण्यासाठी मला बराच कालावधी लागला. मी क्रिकेटपासून स्वत:ला पूर्णपणे दूर करण्याचाही विचार करू लागलो होतो. कारण मला कशाचीही साथ मिळत नसल्याचे वाटू लागले होते.

तो १९९७चा विंडीज दौरा
सचिनच्या आयुष्यातील हा सर्वात खडतर काळ भारताच्या १९९७ मधील वेस्ट इंडीज दौ-याचा आहे. पहिले दोन कसोटी सामने अनिर्णीतावस्थेत सोडवल्यानंतर तिस-या लढतीत भारत विजयाकडे वाटचाल करत होता. संघाला केवळ १२० धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र टीम इंडिया अवघ्या ८१ धावांत गारद झाली. मी स्वत: केवळ चारच धावा करू शकलो होतो.

सचिनची जेव्हा सटकते
> नंतरची वनडे मालिकाही आम्ही ४-१ ने गमावली. तिस-या वनडेत शेवटच्या १० षटकांत ४७ धावा हव्या होत्या. हातात ६ गडी असूनही हरलो. मोठे शॉट लावण्यापेक्षा मैदानी फटके खेळा, असे मी वारंवार बजावत होतो.
>मधली फळी व तळाच्या फलंदाजांनी हवाई फटके खेळले. काही धावबाद झाले. पराभव होत असल्याचे पाहून मी चिडलो. नंत खेळाडूंची बैठक बोलावली. ड्रेसिंग रूममध्ये येताच माझी सटकली.
> मी म्ह्णालो, ही कामगिरी मान्यच नाही. प्रतिस्पर्धी आपल्यापेक्षा चांगला खेळल्यामुळे आलेल्या पराभवाने मी नाराज नाही. मात्र परिस्थिती बाजूने असूनही पराभूत होणे हे संघात गंभीर चूक असल्याचे दर्शवते, असे मी म्हणालो.

३१ मार्च १९९७ हा ब्लॅक डे
सोमवार, ३१ मार्च १९९७ हा भारतीय क्रिकेटमधील काळा दिवस व माझ्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील सर्वात वाईट दिवस होता. आदल्या दिवशी सेंट लॉरेन्स गॅपमधील एका रेस्तराँमध्ये मी वेटरला गमतीने म्हणालो होतो की, कोण विंडीजच्या विजयाची भविष्यवाणी करतोय. सकाळी अँम्बोस भारताला उद्ध्वस्त करून टाकेल, असा त्या वेटरला विश्वास होता.