आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबाद कसोटी : फिरकीसमोर कांगारूंचे लोटांगण!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - भारताने हैदराबाद येथे दुस-या कसोटीत ऑस्ट्रेलियाला अतिशय सहजपणे एक डाव आणि 135 धावांच्या विशाल अंतराने हरवले. भारताच्या फिरकी मा-यापुढे दुस-या डावात कांगारूंनी अवघ्या 131 धावांत गुडघे टेकले. चेन्नई कसोटीचा हीरो आर. अश्विनने दुस-या डावात 63 धावांत 5 गडी, तर डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने 33 धावांत 3 गडी बाद केले. भारताने आता मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यातील विजयासह टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावे नवा रेकॉर्ड जमा झाला आहे. भारतीय कर्णधार म्हणून धोनीने टीम इंडियाला 22 सामन्यांत विजय मिळवून दिला. त्याने सौरव गांगुलीच्या 21 कसोटी विजयाच्या रेकॉर्डला मागे टाकले. पहिल्या डावात झुंजार खेळ करून द्विशतक ठोकणा-या चेतेश्वर पुजाराला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ चा पुरस्कार देण्यात आला.

चौथ्या दिवसाचा खेळ अवघ्या दोन तासांतच संपला. आता पुढची कसोटी 14 मार्चपासून पीसीए मोहाली येथे खेळवली जाईल. हैदराबाद कसोटीत सामन्याच्या चौथ्या दिवशी पाहुण्यांनी 2 बाद 74 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र, कांगारूंना पुढे आणखी फक्त 57 धावाच जोडता आल्या.

दिवसाची वाईट सुरुवात : ऑस्ट्रेलियासाठी दिवसाची अतिशय वाईट सुरुवात झाली. वॉटसन आपल्या तिस-या दिवसाच्या स्कोअरमध्ये एकही धाव न जोडता ईशांत शर्माच्या बाहेर जाणा-या चेंडूला मारण्याच्या नादात यष्टिरक्षक धोनीकडे झेल देऊन बाद झाला. यानंतर कोवान आणि मायकेल क्लार्क यांनी ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 100 धावांपर्यंत पोहोचवला.
क्लार्क झाला बोल्ड : कांगारूंच्या 108 धावा झाल्या असताना रवींद्र जडेजाच्या एका अप्रतिम चेंडूवर मायकेल क्लार्क त्रिफळाचीत झाला. क्लार्कने चेंडूला डिफेंस करण्यासाठी एक पाय पुढे करताना सोबत बॅट पुढे केली. मात्र, चेंडू अचानक आतमध्ये घुसला आणि त्याच्या दांड्या उडाल्या. जडेजाने जबरदस्त चेंडू टाकून भारताला यश मिळवून दिले. लेगस्टंपवर टाकलेला चेंडू ऑफस्टंपकडे वळत यष्टीवर आदळला. या चेंडूला ‘बॉलिंग ऑफ द सिरीज’ असे म्हटले जात आहे.
कोवानचा आत्मविश्वास खचला : क्लार्क बाद झाल्यानंतर कोवानचा आत्मविश्वाससुद्धा खचला. 111 च्या स्कोअरवर तोसुद्धा बाद झाला. जडेजाच्याच चेंडूवर त्याने स्लीपमध्ये सेहवागच्या हाती सोपा झेल दिला. कोवानने टीमसाठी सर्वाधिक 44 धावा काढल्या. त्याने 150 चेंडूंचा सामना करताना सहा चौकार मारले. कोवानच्या जागी खेळण्यास आलेल्या मोएसिस हेनरिक्सकडून टीमला आशा होत्या. मात्र, चार चेंडूंचा सामना केल्यानंतर धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. जडेजाच्या एका थेट फेकीवर त्याला बाद केले.
फिरकीपटूंचा दम : ऑफस्पिनर आर. अश्विनने आपला पहिला कसोटी सामना खेळत असलेला ग्लेन मॅक्सवेल (8), मॅथ्यू वेड (10), जेम्स पॅटिंसन (0) यांना बाद केले, तर जडेजाने पीटर सिडलला (4) बाद करून पाहुण्या संघाचा डाव आटोपला. भारतीय फिरकीपटूंनी या सामन्यात एकूण 14 विकेट घेतल्या. चेन्नईत याच फिरकीपटूंनी तब्बल 20 गडी बाद केले होते. वॉर्नर आणि हुयजेस यांच्यासह अश्विनने सामन्यात पाच
विकेट घेतल्या.
धोनीने विक्रम मोडला, मी आनंदी
धोनीने माझा विक्रम मोडला, यामुळे मी आनंदी आहे. आम्ही तर रिले रेसमध्ये सहभागी झालेले असतो. पुढच्याकडे बॅटन देणे हे आमचे कामच असते. धोनीसुद्धा भविष्यात आणखी कोणाकडे बॅटन देईल.
सौरव गांगुली, माजी कर्णधार.

संपूर्ण संघाला श्रेय जाते
माझ्या या यशाचे श्रेय माझ्या संपूर्ण संघाला, प्रत्येक सदस्याला जाते. सर्वाधिक सामने जिंकताना सर्वांनीच महत्त्वाचे योगदान दिले. हे सांघिक प्रयत्नाचे यश आहे. टीमच्या प्रत्येक सदस्यासह सपोर्ट स्टाफलासुद्धा पूर्ण श्रेय जाते.
महेंद्रसिंग धोनी, कर्णधार, टीम इंडिया.

आम्ही वाईट खेळलो
आम्ही अत्यंत वाईट फलंदाजी केली. या मालिकेमध्येच आमच्या फलंदाजांना धावा काढाव्या लागतील. भारत विजयाचा हक्कदार आहे. त्यांनी खेळाच्या सर्व क्षेत्रांत आमच्यापेक्षा सरस कामगिरी केली.
मायकेल क्लार्क, कर्णधार, ऑस्ट्रेलिया.

देशांतर्गत सामन्यांचा फायदा
घरच्या मैदानावर देशांतर्गत सामन्यात खूप धावा काढण्याचा फायदा मला झाला. यामुळेच मी मोठी खेळी करू शकलो. माझे नुकतेच लग्न झाले आहे. मी चांगली कामगिरी करतो की नाही, यामुळे माझी पत्नी चिंतित होती.
चेतेश्वर पुजारा, सामनावीर.

रोमांचक आकडेवारी
भारताने एक डाव आणि 135 धावांनी मिळवलेला हा विजय टीम इंडियाचा आतापर्यंतचा सहावा मोठा विजय ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा मोठा विजय ठरला असून, यापूर्वी कांगारूंना टीम इंडियाने 1998 मध्ये कोलकाता येथे एक डाव आणि 219 धावांनी धुतले होते. भारताने हे सहा विजय भारतीय उपखंडातच मिळवले आहेत. यातील चार वेळा भारतात आणि दोन वेळा बांगलादेशात विजयश्री मिळवली.
महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियाचे 45 कसोटीत नेतृत्व करताना 22 मध्ये विजय मिळवला आहे. सौरव गांगुलीला (49 सामन्यांत 21 विजय) मागे टाकून धोनी भारताचा आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार ठरला आहे. 22 पैकी 17 विजय धोनीने घरच्या मैदानावर मिळवले आहेत. 26 सामन्यांत भारतीय भूमीवर नेतृत्व करताना धोनीने 17 विजय आणि 3 पराभव स्वीकारले आहेत. भारताबाहेर धोनीने टीम इंडियाला 19 कसोटीपैकी पाच लढतीत विजय मिळवून दिला. विदेशात सर्वाधिक विजय मिळवण्याचा रेकॉर्ड गांगुलीच्याच नावे आहे.
सामन्याचे हीरो
चेतेश्वर पुजारा :
204 धावा
मुरली विजय :
167 धावा.
आर. अश्विन :
06 विकेट
रवींद्र जडेजा :
06 विकेट
45 सामन्यांत महेंद्रसिंग धोनीने नेतृत्व केले आहे.
100% विजयाची सरासरी कर्णधार धोनीची ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर आहे. त्याने सहा सामन्यांत 6 विजय मिळवले आहेत.
कसोटीत भारताचे यशस्वी कर्णधार
कर्णधार सामने विजय पराभव ड्रॉ
महेंद्रसिंग धोनी 45 22 12 11
सौरव गांगुली 49 21 13 15
मो. अझरुद्दीन 47 14 14 19
सुनील गावसकर 47 9 8 30
नवाब पतौडी 40 9 19 12
राहुल द्रविड 25 8 6 11