आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबाद कसोटी : पुजारा-मुरलीची विक्रमी भागीदारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - टीम इंडियाचा नवा मिस्टर रिलायबल चेतेश्वर पुजाराच्या शानदार 204 धावा आणि मुरली विजयच्या 167 धावांच्या बळावर भारताने दुस-या कसोटीत विजयाकडे आगेकूच केली आहे. भारताने पहिल्या डावात 503 धावा काढून तब्बल 266 धावांची मजबूत आघाडी घेतली. तिस-या दिवसाचा खेळ संपला त्या वेळी ऑस्ट्रेलियाने दुस-या डावात 2 बाद 74 धावा काढल्या होत्या.

पुजाराचे कसोटी क्रिकेट कारकीर्दीतील हे दुसरे द्विशतक आणि एकूण चौथे शतक ठरले आहे. यापूर्वी त्याने मागच्या नोव्हेंबर महिन्यात अहमदाबाद येथे इंग्लंडविरुद्ध नाबाद 206 धावा काढल्या होत्या. रविवारी पुजारा 162 आणि मुरली विजय 129 धावांवर नाबाद होते. मुरली विजयनेसुद्धा कसोटीत आपले दुसरे शतक पूर्ण केले. त्याने आपली दोन्ही शतके ऑस्ट्रेलियाविरुद्धच झळकावली आहेत. पुजारा-मुरलीने तिस-या दिवशी सकाळी 1 बाद 311 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. पुजाराने सोमवारी आणखी 38 धावा काढून आपले द्विशतक साजरे केले. दोघांनी सकाळी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली. पुजाराने आपल्या खेळीत एक षटकार आणि 30 चौकार मारले, तर मुरली विजयने 23 चौकार आणि 2 षटकारांसह आपली खेळी सजवली.

असे बाद झाले पुजारा, मुरली : मुरली विजयला ऑफस्पिनर ग्लेन मॅक्सवेलने एड कोवानकरवी झेलबाद केले, तर पुजाराने आपले द्विशतक पूर्ण झाल्यानंतर जेम्स पॅटिन्सनच्या चेंडूवर झेव्हियर डोहर्तीच्या हाती सोपा झेल दिला. कसोटीतील आपल्या नाबाद 206 धावांच्या स्कोअरला मागे टाकण्यापासून तो थोडक्यात चुकला. सकाळच्या सत्रात भारताने या दोन्ही विकेट गमावल्या. जेवणाच्या वेळेपर्यंत भारताचा स्कोअर 3 बाद 400 धावा असा होता.
धोनीने केली आक्रमक फलंदाजी : भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने वेगवान फलंदाजी केली. त्याने 43 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीने 44 धावा काढल्या. विराट कोहलीने 34 धावांची खेळी केली. धोनी-कोहली यांनी पाचव्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. भारताच्या उर्वरित विकेट लवकर पडल्या.
मॅक्सवेलने घेतल्या 4 विकेट : आयपीएल-6 साठी सर्वाधिक महागडा विदेशी खेळाडू ठरलेला ऑफस्पिनर ग्लेन मॅक्सवेलने आपल्या पदार्पणाच्या कसोटीत 4 गडी बाद केले. दुसरा फिरकीपटू झेव्हियर डोहर्तीने 3 विकेट घेतल्या.
विराट कोहलीच्या 1000 धावा पूर्ण
पुजाराशिवाय विराट कोहलीने कसोटी सामन्यांत 1 हजार धावा पूर्ण केल्या. त्याला यासाठी फक्त 2 धावांची गरज होती. चौकाराने सुरुवात करताना त्याने कसोटीत 1000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो 58 वा भारतीय फलंदाज बनला आहे. कोहलीने ही कामगिरी 16 व्या कसोटीच्या 27 व्या डावात केली.
पुजाराचा चार शतके
159 न्यूझीलंडविरुद्ध, हैदराबाद
2012
206* इंग्लंडविरुद्ध, अहमदाबाद, 2012.
135 इंग्लंडविरुद्ध, मुंबई.
2012
204 ऑस्ट्रेलिया- विरुद्ध, हैदराबाद
2013.
विजयची दोन शतके
139
ऑस्ट्रेलियाविरुद्ध, बंगळुरू 2010.
167
ऑस्ट्रेलियाविरुद्ध, हैदराबाद 2013.

सचिन दुर्दैवीरीत्या बाद
जेवणाच्या ब्रेकनंतर सचिन तेंडुलकर दुर्दैवीरीत्या बाद झाला. जेम्स पॅटिंसनचा लेग स्टम्पवर बाहेर जाणा-या चेंडूवर ग्लान्स करण्याचा प्रयत्न सचिनने केला. यष्टिरक्षक मॅथ्यू वेडने लेग साइडला डाइव्ह मारून जबरदस्त झेल घेतला. यावर गोलंदाज आणि विकेटकीपर दोघांनी अपील केले. अपीलनंतर दक्षिण आफ्रिकेचे पंच मरायस एरसमस आणि श्रीलंकेचे कुमार धर्मसेना यांनी आपसांत चर्चा केली आणि नंतर तिस-या पंचांची मदत मागितली. झेल स्पष्ट आहे की नाही, यासाठी थर्ड अम्पायरची मदत घेण्यात आली. टी.व्ही. रिप्लेतसुद्धा चेंडूने बॅटची कड घेतली आहे, हे स्पष्ट होत नव्हते. थोडा वेळ खेळ थांबल्यानंतर थर्ड अम्पायरचा निर्णय आला आणि मैदानी पंचांनी आपल्या जागेवर जाऊन सचिनला बाद ठरवले. सचिनच्या देहबोलीवरून चेंडू बॅटला लागल्याचे मुळीच वाटत नव्हते. सचिनने 7 धावा काढल्या.
पुजाराने घडवले अनेक विक्रम
* पुजाराच्या 1000 धावा पूर्ण : आपल्या अकराव्या कसोटीच्या 18 व्या डावात त्याने एक हजार धावा पूर्ण केल्या. त्याने सर्वात कमी सामन्यांत एक हजार धावा काढण्याच्या सुनील गावसकर यांच्या भारतीय विक्रमाशी बरोबरी केली. मात्र, तो विनोद कांबळीचा विक्रम मोडू शकला नाही. कांबळीने 12 कसोटींच्या 14 डावांत एक हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
*भागीदारीचा विक्रम : पुजाराने मुरली विजयसोबत दुस-या विकेटसाठी 370 धावांच्या भागीदारीचा भारतीय रेकॉर्ड बनवला. भारताकडून कोणत्याही देशाविरुद्ध दुस-या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. यापूर्वी सुनील गावसकर (182 धावा) आणि दिलीप वेंगसरकर (157 धावा) यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध 1978 मध्ये 344 धावांची भागीदारी केली होती.
तरीही विक्रम मोडला नाही
पुजारा आणि मुरली विजय यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठ्या भारतीय भागीदारीचा विक्रम मोडता आला नाही. व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांनी 2001 मध्ये कोलकाता येथे पाचव्या विकेटसाठी 376 धावांची भागीदारी करून रेकॉर्ड केला होता. पुजारा-मुरली यांनी 370 धावांची भागीदारी केली.