आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोलंदाजी, क्षेत्ररक्षणावरही घेतोय मेहनत : अंकित बावणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - फलंदाजी हे तर माझे शक्तिस्थान आहेच. फलंदाजीशिवाय मी सध्या क्षेत्ररक्षण आणि ऑफस्पिन गोलंदाजीवरही मेहनत घेतोय. संघातील माझी उपयुक्तता वाढण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. म्हैसूर येथे एक महिना झालेल्या 25 वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या शिबिराचा मला खूप फायदा झाला, अशी प्रतिक्रिया औरंगाबादचा गुणवंत क्रिकेटपटू अंकित बावणेने ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.


सिंगापूर येथे येत्या ऑगस्ट महिन्यात होणा-या एसीसी इर्मजिंग टीम कप स्पर्धेसाठी 23 वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. औरंगाबादचा अंकित बावणे याचादेखील या संघात समावेश करण्यात आला आहे.


‘सिंगापूर येथील एसीसी इर्मजिंग टीम कप स्पर्धेसाठी निवड झाल्याने निश्चित मी आनंदित आहे. आता या स्पर्धेत दमदार प्रदर्शन करून संधीचे सोने करण्यासाठी माझे प्रयत्न असतील. या स्पर्धेत मला 3 साखळी, उपांत्य आणि अंतिम सामन्यासह जवळपास 4 ते 5 सामने खेळण्याची संधी मिळेल. चांगला स्कोअर करून भारतीय संघाला विजय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल.


फलंदाजी हे माझे शक्तिस्थान आहेच. मी माझ्या ऑफस्पिन गोलंदाजीवरही मेहनत घेतोय. भारतीय संघाला गरजेप्रसंगी मदत करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. मागच्या एकदिवसीय रणजी सत्रात मी ब-याच सामन्यांत गोलंदाजी करून काही विकेटही घेतल्या. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे,’ असेही यावेळी अंकितने सांगितले.


मॅच प्रॅक्टिसचा फायदा
फिटनेसवर मी सर्वाधिक मेहनत घेतो. फिटनेस आणि मॅच प्रॅक्टिस असेल तर प्रत्यक्ष सामन्याच्या वेळी प्रदर्शन करण्यास मदत होते. म्हैसूरच्या शिबिरात झालेल्या प्रॅक्टिस मॅचमध्ये माझा चांगला स्कोअर झाला होता. त्या वेळी मी तीन सामन्यांत 83*, 79 आणि नाबाद 92 असा स्कोअर केला. याचा फायदा झाला. हे सामने बघण्यासाठी निवड समितीचे सदस्य हजर होते, असेही त्याने म्हटले. महाराष्‍ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के, आमच्या रणजी संघाचे प्रशिक्षक आणि एमसीए सदस्यांकडून वेळोवेळी मिळणा-या मार्गदर्शनाचाही फायदा झाल्याचे त्याने नमूद केले.


एनसीएचे प्रशिक्षण शिबिर खेळाडूंसाठी सर्वोत्तम
नॅशनल क्रिकेट अकॅडमीकडून (एनसीए) आयोजित शिबिर सर्वोत्तम असते. एनसीएच्या शिबिरात एक खेळाडूवर दोन-दोन प्रशिक्षक मेहनत घेत असतात. खेळाडूंना स्वत:च्या बारीकसारीक चुका लक्षात येत नाहीत. एनसीएचे तज्ज्ञ छोट्या छोट्या चुका लक्षात आणून देतात आणि त्या दुरुस्त करण्यासाठी मेहनत घेतात. फलंदाज असो वा गोलंदाज..त्याला त्याच्या क्षेत्रात परिपूर्ण, निपुण करण्यासाठी एनसीएकडून नेहमी बेस्ट प्रयत्न केले जातात. एनसीएच्या शिबिराने माझ्यात आमूलाग्र बदल झाला. एक सकारात्मक ऊर्जा माझ्यात निर्माण झाली. त्यामुळे संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वासही वाढला आहे, असे अंकित म्हणाला.