आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Don't Want To Play Zaheer In My Duration With India Greg Chappell

मी प्रशिक्षक असेपर्यंत तू भारताकडून खेळणार नाहीस, चॅपेल यांनी दिली होती जहीरला धमकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मी जोपर्यंत भारताचा प्रशिक्षक असेन तोपर्यंत तू भारतासाठी खेळणार नाहीस, असे धक्कादायक विधान त्या वेळचे टीम इंडियाचे प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी जहीर खानशी बोलताना केले होते. त्यावर जहीर खानला प्रतिक्रिया काय द्यावी, हेही क्षणभर कळले नाही.
जहीर म्हणत होता, मी फक्त त्यावर हसलो. त्या विधानावर काय प्रतिक्रिया द्यावी, हे क्षणभर मला कळले नाही. मी हबकूनच गेलो. काय करावे हे सुचेना. आपण प्रतिकार करावा का? का कर्णधाराला याबाबत सांगावे? त्यांच्या विधानाला महत्त्व द्यावे का? असे अनेक प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले. ग्रेग माझ्या बाबतीत असे का वागतोय, तेच कळत नव्हते, असे जहीर खान पुढे म्हणाला.

जहीर म्हणतो, ‘२००५ ते २००७ हा ग्रेग चॅपेल यांच्या प्रशिक्षकपदाचा कालावधी म्हणजे मला आठवत असलेला भारतीय क्रिकेटमधील सर्वात काळाकुट्ट कालावधी होता.’
ग्रेग चॅपेलच्या काही निश्चित अशा कल्पना होत्या. त्या कल्पनांच्या विरुद्ध जाणा-यांना तो बाजूला काढायचा. ग्रेग चॅपेल याचा स्वत:चा वेगळा कार्यक्रम होता. तो त्यासाठी वैयक्तिक पातळीवर उतरायचा. त्याने माझी कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केला. पण २००६च्या सुमारास मी दक्षिण आफ्रिका दौ-यात उसळून उठलो. अधिक कणखर झालो.

संघातील ज्येष्ठ खेळाडूंविरुद्ध ग्रेगचा कायम झगडा असायचा. मी वर्षभर भारतीय संघाबाहेर असताना माझ्या पुनरागमनाची संधी हिरावण्याचा त्याने वारंवार प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा निवडीसाठी माझे नाव चर्चेत आले, तेव्हा चॅपेल मला रोखण्यासाठी कारणे द्यायचा. त्यामुळे ३-४ महिने पुनरागमन पुढे ढकलले जायचे. मात्र, चॅपेलच्या या विरोधानंतरही मी खचलो नाही. दक्षिण आफ्रिकेत मी प्रयत्नपूर्वक नकारात्मक गोष्टी दूर करून पुनरागमन यशस्वी केले. खेळाडू आनंदी असले तर जिंकू शकतात.

मला जुनी घटना आठवते. २००८ च्या ऑस्ट्रेलियाच्या भारत दौ-यात प्रतिस्पर्धी संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये ग्रेगला पाहून मी पेटून उठलो होतो व चांगली कामगिरी करण्यास प्रेरित झालो होतो. चांगली कामगिरी करून मी माझ्यातील राग त्या वेळी व्यक्त केला होता, असे जहीरने शेवटी नमूद केले. ३६ वर्षीय जहीर खानने कसोटीत ३११, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये २८२ बळी घेतले आहेत.

चॅपेल राजवटीत आनंद नव्हता...
चॅपेल राजवटीत भारतीय खेळाडूंचा संच निश्चितच आनंदी नव्हता. वैयक्तिक आवडी-निवडीनुसार संपूर्ण संघालाच वेठीस धरले जात होते. त्या कालावधीत माझा ग्रेगशी फार संबंध यायचा नाही; परंतु मला आठवतेय, मी संघाला विजयी केले की त्यातही ग्रेग चुका व कमतरता शोधायचा. हा अनुभव माझाच नाही, तर मला वाटते ऑस्ट्रेलियन खेळाडूंचाही ग्रेगबाबत असेल.