आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Will Win Gold Medal, Says Tejaswini Muley, Divya Marathi

अनुभवाचे बोल: आशियाई स्पर्धेच्या अनुभवातून साधणार ‘सुवर्णवेध’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पदार्पणातील आशियाई चॅम्पियनशिपमधील वातावरण, दिग्गज नेमबाजांसोबत खेळतानाचा उत्साह, आगामी ऑलिम्पिक स्पर्धेच्या तिकिटासाठी कोटा पूर्ण करण्याची प्रत्येकाची धडपड, अपयशानंतरही पुन्हा सावरण्याची जिद्द, यासारखा अनुभवातून मी राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णवेध घेईल, असा विश्वास शिवछत्रपती पुरस्कार विजेती नेमबाज तेजस्विनी मुळेने दैनिक ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला. औरंगाबादची ही युवा नेमबाज बुधवारी मायदेशी परतली.

मला इंचियोन आशियाई स्पर्धेत अनेक चांगल्या गोष्टी आत्मसात करता आल्या. याच अनुभवाच्या बळावर मी आगामी स्पर्धेत सोनेरी यश संपादन करेल, असेही तेजस्विनी म्हणाली.
येत्या १४ नोव्हेंबरपासून पुण्यात राष्ट्रीय नेमबाज चॅम्पियनशिप होणार आहेत. या स्पर्धेच्या तीन प्रकारात आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी नशीब आजमावणार आहे. ती स्पोर्टस रायफल, थ्री पोझिशन व प्रोन आणि १० मीटर एअर रायफल प्रकारात खेळणार आहे. यासाठी सरावाला प्रारंभ करणार असल्याचेही तिने सांगितले.

होम ग्राउंडवर सुवर्णसंधी
पुण्यात राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेतून आगामी सत्राला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा पुण्यातील बालेवाडीत रंगणार आहे. यातून मला होम ग्राउंडवरील नित्याच्या सरावाचा मोठा फायदा मिळू शकतो. त्यामुळे स्पर्धेत मला सुवर्णसंधी आहे. यासाठी मी कसून सराव करणार आहे. या स्पर्धेतील सुवर्णपदकाने नव्या सत्राला दमदार सुरुवात करण्याचा माझा प्रयत्न असेल, असेही तेजस्विनी म्हणाली.

पोझिशनमधील बदलाने अपयश
वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि आशियाई स्पर्धेच्या तयारीदरम्यान, माझ्या प्रशिक्षकांनी पोझिशनमध्ये बदल करण्याचे सांगितले. मात्र, याच बदलामुळे काहीसे तंत्र बिघडले. हा बदल योग्यरीत्या आत्मसात करता आला नाही. याचा परिणाम जागतिक नेमबाजी आणि आशियाई स्पर्धेतील कामगिरीवर पडला. यातून मला समाधानकारक यश संपादन करता आले नाही, अशी खंतही तेजस्विनीने व्यक्त केली.