दुबई - भारतीयसंघ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. इंग्लंडविरुद्ध दोन शानदार विजय तसेच ऑस्ट्रेलियाचा दुबळ्या झिम्बाब्वेकडून झालेल्या अनपेक्षित पराभवाचे हे फलित आहे. मात्र अग्रस्थान टिकवण्यासाठी
टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धचे उरलेले दोन्ही सामने जिंकावे लागतील. त्याशिवाय द. आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियन विजयासाठी प्रार्थनाही करावी लागेल.
आयसीसीने ताजी क्रमवारी प्रसिद्ध केली आहे. भारत पहिल्या (११४ गुण), द. आफ्रिका दुसऱ्या (११३) आणि श्रीलंका तिसऱ्या (१११) स्थानी आहे. हरारेत झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा ३१ वर्षांनंतर पराभव केला. त्यामुळे माजी विश्वविजेत्यांची चौथ्या स्थानी (१११) घसरण झाली. कांगारू तसेच श्रीलंकेचे गुण समान असले तरी पाॅइंटच्या फरकाने लंकेने बाजी मारली. ऑस्ट्रेलिया तसेच झिम्बाब्वेला चिरडल्याने द. आफ्रिका दुसऱ्या स्थानी कायम आहे.
जर आणि तरचे समीकरण
याआठवड्यात पाच एकदिवसीय सामने होणार आहेत. त्यामुळे ही क्रमवारी अजूनही बदलू शकते. तिरंगी मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धचे दोन सामने आफ्रिकेने जिंकले तर ते पहिल्या स्थानी येतील. कसोटीत हा संघ आधीच प्रथम स्थानी आहे. समजा आफ्रिका आणि भारतानेही उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर दोघांचेही समान ११५ गुण होतील. मात्र पॉइंटच्या बळावर आफ्रिकाच बाजी मारेल आणि अव्वल क्रमांक पटकावेल. अशा परिस्थितीत टीम इंिडया दुसऱ्या क्रमांकावर घसरेल. भारताने इंग्लंडविरुद्ध उर्वरित दोन्ही सामने गमावले तर आफ्रिकेला लोळवून कांगारूंनाही पहिले स्थान गाठण्याची नामी संधी आहे. भारतीय संघाला
आपले स्थान टिकवण्यासाठी दोन्ही लढतीत दमदार प्रदर्शन करून िवजय निश्चित करावा लागेल.