आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिल्याच प्रयत्नात ‘आयबीएल’ची यशस्वी पायाभरणी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दोनआठवड्यांपूर्वी भारतीय बॅडमिंटन लीग (आयबीएल) सुरू होताना क्रीडा रसिक, आयोजक, खेळाडू आणि पुरस्कर्ते व टेलिव्हिजन वाहिन्या यांच्या मनात अनेक प्रश्न, शंका-कुशंका होत्या. दोन आठवड्यांनंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्रातील एक यशस्वी प्रयोग (मॉड्यूल) म्हणून या लीगचे कौतुक होत आहे. या कल्पनेचे जनक व भारताचे माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना या लीगच्या यशाच्या अनेक बाजू सांगितल्या.


या स्पर्धेच्या यशाची पहिली पोचपावती म्हणजे पुढील लीगसाठी आपापले संघ घेण्यासाठी अनेक उद्योजकांनी आतापासूनच विचारणा सुरू केली आहे. याचाच अर्थ पुढील लीगच्या वेळी निश्चितच संघ वाढलेले असतील.
स्पर्धेचा आटोपशीर कार्यक्रम आणि भारतातील पाहुणचार यामुळे जगातील अव्वल बॅडमिंटन खेळाडू प्रचंड खुश झाले आहेत. त्यांनी आपापल्या ब्लॉगवर, प्रसिद्धिमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीद्वारे ही गोष्ट उघडपणे सांगितल्यामुळे जगातील अन्य अग्रगण्य बॅडमिंटनपटूंनी या लीगसाठी आपला होकार आताच कळवला आहे.


चीनचे अव्वल खेळाडू आपल्या देशाच्या संबंधितांकडे आगामी लीगमध्ये कसे सहभागी होता येईल याची चौकशी करीत आहेत.


त्यामुळे आगामी आयबीएलमध्ये चिनी खेळाडू सहभागी झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या गिलख्रिस्ट, शेन वॉर्न यांच्यासारख्या खेळाडूंना आयपीएलमुळे आर्थिक स्थैर्य मिळालेच, परंतु अचानक खेळापासून दूर होण्याचा मनस्ताप टाळता आला. तौफिक हिदायन, पीटर गेड यांच्यासारख्या अनेक वर्ल्ड फेमस खेळाडूंना ‘आयबीएल’ लीग यापुढे आधार वाटणार आहे.


जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला ली चोंग वेई किंवा महिलांमध्ये दुसरे, तिसरे, चौथे रँकिंग असणा-या खेळाडूंच्या सहभागाचा भारताच्या बॅडमिंटनपटूंना प्रचंड लाभ झाला. भारतीय व महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनांनाही खेळाच्या विकासासाठी भरघोस रक्कम मिळाली.


दिग्गजांबरोबर खेळण्याची संधी
भारतीय खेळाडूंना सलग 14 दिवस जगातील सर्वोत्तम खेळाडूंच्या विरुद्ध किंवा बरोबरीने उच्च दर्जाचे बॅडमिंटन खेळता आले. ली चोंग वेईसारख्या पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूंसोबत भारताच्या अन्य खेळाडूंना सामना खेळण्याची संधी कधीच मिळाली नसती.


अवघ्या 15 दिवसांत भरघोस कमाई
अवघ्या 15 दिवसांत खेळल्याबद्दल मिळालेले मानधन किमान 10 लाख रुपयांचे होते, तर ली चोंग वेई किंवा सायनासारख्या आयकॉन असलेल्या खेळाडूंना सुमारे 80 ते 85 लाख रुपये मिळाले. ही रक्कम जागतिक बॅडमिंटन क्षेत्रातील सर्वोच्च मानधनाची रक्कम मानली गेली.