लीड्स - सलगच्या पराभवाची मालिका खंडित करून इंग्लंडने भारताविरुद्ध पाच वनडेच्या सिरीजचा शेवट गोड केला. यजमान संघाने शुक्रवारी मालिकेतील शेवटच्या पाचव्या वनडेत भारतावर ४१ धावांनी मात केली. यासह यजमानांनी मालिकेत विजयी चौकाराचे
टीम इंडियाचे मनसुबे उधळून लावले. भारताने ही मालिका ३-१ ने
आपल्यानावे केली.
शतक झळकवणारा इंग्लंडचा ज्योरुट सामनावीर व भारताचा सुरेश रैना मालिकावीरचा मानकरी ठरला.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने सात गडी गमावून भारतासमोर विजयासाठी २९५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, प्रत्युत्तरात भारताने २५३ धावांत गाशा गुंडाळला. भारताकडून रवींद्र जडेजाने नाबाद ८७ आणि अंबाती रायडूने ५३ धावांची खेळी केली. मात्र, या दोघांनाही संघाचा पराभव टाळता आला नाही. गोलंदाजीत इंग्लंडकडून स्टोक्सने तीन गडी बाद केले.
धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर अजिंक्य रहाणे भोपळा न फोडताच तंबूत परतला. त्यापाठोपाठ
विराट कोहली १३ धावांवर बाद झाला. अखेर शिखर धवन आणि रायडूने संघाचा डाव सावरला. धवनने ४४ चेंडूंचा सामना करताना चार चौकार आणि एका षटकारासह ३१ धावा काढल्या. तसेच अंबाती रायडूने ६५ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या साह्याने ५३ धावा काढल्या. दरम्यान, स्टोक्सने कुककरवी रायडूला बाद केले.
स्टोक्सचे तीन बळी : इंग्लंडकडून गोलंदाजीत बेन स्टोक्सने सात षटकांत ४७ धावा देऊन तीन बळी घेतले. त्यापाठोपाठ जेम्स अँडरसन, माेईन अली आणि स्टीव्हन फिनने प्रत्येकी दोन गडी बाद केले.