आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंतिम सामन्यात भारत-पाक भिडणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर- मनप्रीत जुनेजाचे (76) अर्धशतक आणि अक्षर पटेलच्या (29 धावा व 4 बळी) अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने संयुक्त अरब अमिरातला (यूएआय) 46 धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने 23 वर्षांखालील आशियाई क्रिकेट कौन्सिल इमर्जिंग टीम चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली.

भारताचा अंतिम मुकाबला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. पाकने उपांत्य फेरीत श्रीलंकेचा रोमांचक लढतीत 7 चेंडू व 1 गडी राखून मात केली. अंतिम लढत रविवारी होणार आहे. भारताने साखळी सामन्यात पाकिस्तानला 3 गडी राखून पराभूत केले आहे. या वर्षी याच स्पर्धेत हे दोन्ही संघ दुस-यांदा समोरासमोर आले आहेत.

भारताने 41.5 षटकांत 208 धावा काढल्या. भारताच्या मनप्रीत जुनेजाने 121 चेंडूचा सामना करताना 76 धावांची खेळी केली. लोकेश राहुलने (43) जुनेजासोबत 94 धावांची भागीदारी केली. अंकित बावणेने 23 आणि अशोक मनेरियाने 25 धावा जोडल्या. इतर सहा फलंदाज केवळ 25 धावांचे योगदान देऊ शकले. यूएआयच्या नासीर अजिजने 51 धावा देत 5 गडी आणि मोहंमद नवीदने 37 धावांत 3 गडी बाद केले.

यूएआय 162 धावा करू शकला. सलामीवीर शेमान अन्वर (44) व स्वप्निल पाटीलने (41) दुस-या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलने 5 धावांच्या अंतरात तीन बळी घेत यूएआयला बॅकफूटवर ढकलले. भारताच्या अक्षरने 4, संदीप शर्मा व बाबा अपराजितने सामन्यात प्रत्येकी 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक
भारत : 208 धावा (राहुल 43, जुनेजा 76, अंकित बावणे 23, मनेरिया 30, 5/51 नासेर अजीझ, 3/37 मो. नावेद) वि. वि. संयुक्त अरब अमीरात : सर्वबाद 162 (एस अन्वर 44, एस. पी. पाटील 41, नासेर अजीझ 14, अहमद राजा 15, 4/29 ए. पटेल)