नव्या वर्षात विजयी / नव्या वर्षात विजयी सुरुवात करण्यासाठी ‘धोनी ब्रिगेड’ सज्ज

वृत्तसंस्था

Jan 03,2012 12:18:05 AM IST

सिडने - भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौ-यातील पहिल्या कसोटीतील पराभव विसरून नव्या वर्षात विजयी प्रारंभ करण्यास सज्ज झाला आहे. मालिकेतील दुस-या कसोटीला मंगळवारपासून सुरुवात होत असून, दोन्ही संघ यात विजयासाठी जोरदार प्रयत्न करतील. या सामन्यात विजय मिळवून मालिकेत पुनरागमन करण्यासाठी धोनी ब्रिगेडचा प्रयत्न असेल. दुसरीकडे मालिकेत 1-0 ने पुढे असलेला ऑस्ट्रेलिया संघ ही आघाडी वाढवण्याच्या इराद्यात असेल.
सिडनेच्या मैदानावरील हा 100 वा कसोटी सामना ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ या ऐतिहासिक सामन्यात चांगली कामगिरी करून ही लढत संस्मरणीय करण्यासाठी प्रयत्न करील. दुसरीकडे भारताचे दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्यासाठी हे आवडते मैदान आहे. भारतीय संघाने येथे विजय मिळवावा, अशी आशा चाहत्यांची असेल. सिडनी शंभर कसोटी सामन्यांचे आयोजन करणारे जगातील तिसरे मैदान ठरेल. केवळ लॉर्ड्स आणि मेलबर्नच्या मैदानावर शंभरपेक्षा अधिक कसोटी सामने झालेले आहेत.
गंभीर, कोहलीच्या फॉर्मची चिंता - दोन वर्षांपासून गौतम गंभीर शतक ठोकू शकलेला नाही. कर्णधार धोनी आणि विराट कोहलीसुद्धा धावा काढण्यासाठी संघर्ष करीत आहेत. या खेळाडूंचा हरवलेला फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. कोहलीला अंतिम अकरा खेळाडूंत स्थान मिळेल की नाही याचा निर्णय सामन्यापूर्वीच घेतला जाईल, असे भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने म्हटले आहे. कोहलीच्या जागी मधल्या फळीचा फलंदाज रोहित शर्माला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटीसाठी 11 खेळाडूंची घोषणा केली असून, यजमान संघाने मेलबर्नचा संघ कायम ठेवला आहे.
टीम इंडिया पुनरागमन करणार - दुस-या कसोटीत पुनरागमन करण्यास टीम इंडिया सज्ज आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची क्षमता आमच्या संघात आहे. आम्ही यापूर्वीसुद्धा अशा परिस्थितीतून पुनरागमन केले आहे, असे भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले. स्वत:च्या फलंदाजीच्या फार्मबद्दल विचारले असता धोनी म्हणाला, ‘घाई करण्याची गरज नाही. मी माझ्या फलंदाजीच्या नैसर्गिक शैलीत बदल करू शकत नाही. केवळ एका मालिकेत शैली बदलणे शक्य नसते.’
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, विराट कोहली, रोहित शर्मा, आर. अश्विन, जहीर खान, ईशांत शर्मा, उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया : मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ईडी कोवान, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, मायकेल हसी, ब्रेड हॅडिन, पीटर सिडल, जेम्स पॅटिन्सन, नॅथन लॉयन, बेन हिल्फेनहॉस.

X
COMMENT