आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Australia Test: Devid Warner Completes His Tenth Century

पहिली कसोटी: डेव्हिड वॉर्नरने ठोकले कारकीर्दीतील दहावे शतक; ऑस्ट्रेलिया ६ बाद ३५४

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : वॉर्नर
अ‍ॅडिलेड - भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत वेगवान खेळ करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर ६ बाद ३५४ धावा काढल्या. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आक्रमक फलंदाजी करताना अवघ्या १६३ चेंडूंत १९ चौकारांच्या साह्याने १४५ धावा ठोकल्या. त्याचे हे कसोटी कारकीर्दीतील दहावे शतक ठरले. त्याच्या आक्रमक फलंदाजीने ऑस्ट्रेलियाची धावगती वाढली. कांगारूंकडून कर्णधार मायकेल क्लार्क (६०) आणि स्टीव्हन स्मिथ (७२*) यांनी अर्धशतके ठोकली. दिवंगत खेळाडू फिलिप ह्यूजच्या निधनामुळे शोकाकूल ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी मानसिक दबावावर नियंत्रण ठेवताना फलंदाजी केली. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी सहापैकी पाच गडी बाद केले. मात्र, यजमानांच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांना रोखता आले नाही.

भारताकडून मोहंमद शमीने पहिल्या दिवसाच्या अखेरच्या क्षणी दोन विकेट घेतले. अखेरीस त्याने नॅथन लॉयन आणि ब्रेड हॅडिन यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र, तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभा केला होता. भारताकडून ईशांत शर्माने आपल्या वेगवान गोलंदाजीतील वेग आणि स्विंगने प्रभावित केले. त्याने दोन गडी बाद केले. पदार्पणाचा कसोटी सामना खेळत असलेला लेगस्पिनर कर्ण शर्माने शतकवीर डेव्हिड वॉर्नरची मौल्यवान विकेट घेतली. भारताकडून वरुण अ‍ॅरोनने दोन (वॉटसन, मिशेल मार्श) गडी बाद केले.

ऑस्ट्रेलियाला दोन धक्के
ऑस्ट्रेलियन फलंदाज मायकेल क्लार्कने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या ८८ धावांपर्यंत ऑस्ट्रेलियाला दोन धक्के बसले. क्रिस रॉजर्स (९) आणि शेन वॉटसन (१४) दोघेही वरुण अ‍ॅरोनच्या गोलंदाजीवर बाद झाले. अ‍ॅरोनने रोजर्सला आठव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर स्लिपमध्ये धवनकरवी झेलबाद केले. रॉजर्सने २२ चेंडूंचा सामना करताना एका चौकाराच्या मदतीने ९ धावा काढल्या. यानंतर वॉर्नर-वॉटसन यांनी ३८ धावांची भागीदारी केली. वॉटसनने ३३ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने १४ धावा काढल्या. अ‍ॅरोनने वाॅटसनचा अडथळासुद्धा धवनकरवीच दूर केला.

मायकल क्लार्क, स्टिवन स्मिथ चमकले
वॉर्नर आणि क्लार्क यांनी तिस-या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. वॉर्नरने जेवणाच्या ब्रेकनंतर आपले शतक पूर्ण केले. वॉर्नरने अवघ्या १०६ चेंडूंचा सामना करताना १४ चौकारांच्या साह्याने वनडे स्टाइल शतक ठोकले. वॉर्नरने पहिल्या विकेटसाठी रॉजर्ससोबत ५० आणि नंतर स्मिथसोबत तिस-या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. वॉर्नरने १६३ चेंडूंचा सामना करताना १९ चौकारांच्या मदतीने १४५ धावा ठोकल्या. पाचव्या क्रमांकावर आलेल्या स्मिथने १३० चेंडूंचा सामना करताना ९ चौकार ठोकत नाबाद ७२ धावा काढल्या. स्मिथने मिशेल मार्शसोबत चौथ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली. दोघांनीच ऑस्ट्रेलियाला तीनशेचा टप्पा गाठून दिला.

क्लार्क जखमी; खेळणे अनिश्चित
पाठीचे स्नायू दुखावल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क चांगलाच त्रस्त झाला. सुरुवातीपासूनच दुखापतीमुळे त्याचा सामन्यातील सहभाग संदिग्ध मानला जात होता. मात्र, तो मैदानावर उरतला. त्याने अर्धशतकही ठोकले. मात्र, चहापानाच्या ब्रेकपूर्वी तो रिटायर हर्ट झाला. यामुळे चांगल्या सुरुवातीनंतरही ऑस्ट्रेलियाच्या डावात विघ्न पडले. कसोटीतील उर्वरित दिवसांत तो खेळेल की नाही, याबाबत संदिग्ध स्थिती आहे. क्लार्कने ८४ चेंडूंचा सामना करताना ९ चौकार खेचत ६० धावा काढल्या. ईशांत शर्माचा एक शॉर्ट चेंडू खेळताना त्याचे स्नायू दुखावले. मेडिकल स्टाफने मैदानावर थांंबून त्याच्यावर काहीवेळ उपचारही केले.

ऑस्ट्रेलियाकडून यांनी गाजवले मैदान...
ऑस्ट्रेलिया : ७.१ षटकांत ५० धावा. २१.३ षटकांत १०० धावा. ४०.६ षटकांत २०० धावा. ६९.५ षटकांत ३०० धावा.
स्टीव्हन स्मिथ : ५० धावा (९० चेंडू, ६ चौकार).
डेव्हिड वॉर्नर : ५० धावा (४५ चेंडू, ९ चौकार), १०० धावा (१०६ चेंडू, १४ चौकार).
मायकेल क्लार्क : ५० धावा (६९ चेंडू, ८ चौकार).

६३ धावा झाल्यानंतर आकाशाकडे बघून ह्यूजचे स्मरण
डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ यांनी आपापल्या खेळीदरम्यान ६३ धावांच्या स्कोअरवर पोहोचल्यानंतर आकाशाकडे बघून बॅट उंचावत दिवंगत मित्र ह्यूजचे स्मरण केले. बाउन्सर लागून ह्यूज जखमी झाला होता. त्या वेळी तो ६३ धावांवर खेळत होता. नंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. ह्यूजच्या ६३ धावांच्या संख्येला गाठल्यानंतर त्याच्या सहका-यांनी त्याचे स्मरण केले.

हेही आहे महत्त्वाचे
-मायकेल क्लार्कने कसोटीतील २८ वे अर्धशतक साजरे केले. भारताविरुद्ध हे त्याचे सातवे अर्धशतक होते.
-क्लार्कने आतापर्यंत भारताविरुद्ध ५४.८३च्या सरासरीने २२ डावांत १९७४ धावा काढल्या आहेत. भारताविरुद्ध २००० कसोटी धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी त्याला २६ धावांची गरज आहे.
-कर्णधार म्हणून क्लार्कने १३ शतके, ८ अर्धशतके ठोकली.
-कसोटीत निवृत्त होण्याची ही क्लार्कची दुसरी वेळ ठरली आहे.
-अ‍ॅडिलेडवर १०० पेक्षा अधिक सरासरीने धावा काढणारा क्लार्क तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याने येथे १० कसोटींत १०३.०० च्या सरासरीने १३३९ धावा काढल्या. त्याच्याशिवाय येथे लिंडसे हॅसेट (१२८.२५) आणि सर डॉन ब्रॅडमन (१०७.७७) यांनीच येथे शंभरपेक्षा अधिक सरासरीने धावा काढल्या आहेत.
- स्मिथने कारकीर्दीतील नववे आणि भारताविरुद्ध दुसरे अर्धशतक ठोकले.
- वॉर्नरने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून ७ कसोटीत ७३.७६ च्या सरासरीने सर्वाधिक ९५९ धावा काढल्या आहेत.