» India-Australia Test Matches Would Be Interesting - Yuraj

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका चुरशीची होईल : युवराज

वृत्तसंस्था | Feb 20, 2013, 05:59 AM IST

  • भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील  मालिका चुरशीची होईल : युवराज

मुंबई - आगामी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका चुरशीची होईल, असे मत भारताचा मधल्या फळीचा डावखुरा फलंदाज युवराजसिंगने म्हटले आहे.

‘ही मालिका एकूणच चांगली होईल. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. कोणालाही कमी लेखता येणार नाही,’ असे या मालिकेसाठी टीम इंडियात निवड न झालेल्या युवीने म्हटले. या वेळी त्याने ऑफस्पिनर हरभजनच्या निवडीबाबत आनंद व्यक्त केला. हरभजनसिंगच्या कारकीर्दीतील ही 100 वी कसोटी ठरेल.

‘शंभर कसोटी खेळणे ही मोठी कामगिरी आहे. भज्जी भारताच्या महान गोलंदाजांपैकी एक आहे. तो असा खेळाडू आहे, जो बॅटनेसुद्धा आपले योगदान देतो. हरभजनची निवड झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. तो या मालिकेत चांगली कामगिरी करेल,’ असा विश्वास 31 वर्षीय युवीने व्यक्त केला.

भारत -ऑस्ट्रेलियात 22 फेब्रुवारीपासून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. धोनी आणि ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन क्लार्क यांच्या नेतृत्व शैलीबाबत विचारले असता, युवी म्हणाला, ‘मी कधीही क्लार्कच्या नेतृत्वाखाली खेळलो नाही. मात्र, तो एक चांगला खेळाडू आणि कांगारूंचा दमदार कर्णधार आहे. यामुळे ही मालिका म्हणजे दोन उत्तम कर्णधारांची झुंजसुद्धा असेल.’
पुनरागमन जोरदार होते
माझे क्रिकेटमधील पुनरागमन जोरदार ठरले. मी मागचे सहा महिने खूप कठीण सराव केला. माझ्यावर उपचार झाले तेव्हापासून मी पुनरागमनाच्या तयारीत होतो. पूर्वीच्या तुलनेत आता मी पूर्ण फिट आहे,’
युवराजसिंग, क्रिकेटपटू.

Next Article

Recommended