आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीसी वनडे क्रमवारी टीम इंडिया सिंहासनावर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेला वनडे मालिकेत ५-० ने धुतले. या विजयाने आयसीसीच्या वनडे क्रमवारीत भारताचा फायदा झाला. भारताचे फक्त गुण वाढले नाहीत तर क्रमवारीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिकेला मागे टाकले. टीम इंडिया आता ११७ गुणांसह क्रमवारीत सर्वात पुढे आहे. यापूर्वी भारताच्या नावे ११३ गुण होते.
आयसीसीने सोमवारी नव्याने क्रमवारी जाहीर केली. नव्या क्रमवारीत द. आफ्रिका दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. या तीन संघांशिवाय श्रीलंकेचा संघ तीन गुणांच्या नुकसानीनंतरही चौथ्या क्रमांकावर कायम आहे. श्रीलंकेला आता इंग्लंडविरुद्ध सात एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. क्रमवारीत इंग्लंडचा संघ श्रीलंकेच्या तुलनेत एका गुणाने मागे असून, पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. सध्या नंबर वनचे सिंहासन कोणाकडे असेल, याचा निर्णय ऑस्ट्रेलिया-द. आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या वनडे मालिकेवर अवलंबून आहे. या दोन्ही संघाकडे पुन्हा नंबर वनच्या सिंहासनावर जाण्याची संधी आहे. नंबर वनचे स्थान मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया किंवा द. आफ्रिकेला मालिकेतील उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागतील. सध्या दोन्ही संघ मालिकेत १-१ ने बरोबरीत आहेत. कोहलीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेवरील ५-० अशा विजयाचा क्रमवारीत फायदा

मीसुद्धा हेलिकॉप्टर शॉट मारला : कोहली
आम्ही आमचा नियमित कर्णधार एम.एस.धोनीच्या घरच्या मैदानावर खेळत होतो. आम्हाला विजयासाठी प्रयत्न करणे गरजेचे होतेच. मात्र, आपल्या कर्णधाराला विजयाची भेट देताना त्याच्याप्रमाणे हेलिकॉप्टर शॉटसुद्धा मारण्याची माझी इच्छा होती. मी त्याच्याप्रमाणे हेलिकाॅप्टर शॉट मारण्यात यशस्वी ठरलो, त्यामुळे आनंदी आहे, असे टीम इंिडयाचा प्रभारी कर्णधार विराट कोहलीने म्हटले. पुरस्कार वितरण सोहळा संपल्यानंतर मीडियाशी बोलताना कोहलीने ही माहिती दिली.
विजयाचे श्रेय एकजुटीला : मैदानावर आक्रमकता आणि योगदानासह शानदार विजयाचे श्रेय मी संघाच्या एकजुटीला देतो. आम्ही एकजूट, आक्रमक होऊन खेळलो, असे कोहली म्हणाला. आपल्या खेळाडूंनी पूर्ण सकारात्मक दृष्टीने आणि आक्रमकपणे खेळ केला, असे कोहलीने म्हटले.
वनडे क्रमवारी अशी
क्रम टीम सामने गुण
१. भारत ६७ ११७
२. द. आफ्रिका ४७ ११५
३. ऑस्ट्रेलिया ४५ ११४
४. श्रीलंका ७० १०८
५. इंग्लंड ४५ १०७
६. पाकिस्तान ५३ ९८
७. न्यूझीलंड ३३ ९६
८. वेस्ट इंडीज ४६ ९६
९. बांगलादेश २८ ६९
१०. झिम्बाब्वे ३१ ५८
११. अफगाणिस्तान १३ ४२
१२. आयर्लंड ०९ ३३