आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाने इंग्रजांचा कापला पतंग; मालिकेत 1-1 ने बरोबरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोची - तब्बल 70 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीने खचाखच भरलेल्या नेहरू स्टेडियमवर भारताने दुस-या वनडेत इंग्लंडला 127 धावांनी सहजपणे मात दिली. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. टीम इंडियाने शानदार फलंदाजी आणि दमदार गोलंदाजी करीत हा सामना जिंकला. यापूर्वी 6 एप्रिल 2006 मध्येसुद्धा भारताने इंग्लंडला येथे हरवले होते.

टीम इंडियाकडून कर्णधार महेंद्रसिंग धोनी (72), प्लेअर आॅफ द मॅच रवींद्र जडेजा (61*) आणि सुरेश रैना (55) यांच्या फलंदाजीशिवाय युवा स्विंग गोलंदाज भुवनेश्वरकुमार (3/29) आणि आॅफस्पिनर आर. अश्विनने (3/39) विजयात योगदान दिले. धोनीच्या कुशल नेतृत्वामुळे भारताने अखेरपर्यंत विरोधी टीमवर दबाव कायम ठेवला. शानदार अर्धशतकी खेळी केल्यानंतर दमदार गोलंदाजी करून दोन विकेट घेणारा रवींद्र जडेजा सामनावीराचा मानकरी ठरला. त्याने एका फलंदाजाला धावबादसुद्धा केले.

भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 285 धावा काढल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव 36 षटकांत 158 धावांत आटोपला. टीम इंडियाने सुरुवातीला जबाबदारीने खेळी करताना धावा जोडल्या.
नंतर इंग्लंडच्या टॉप आॅर्डरला गुंडाळत मधल्या फळीवर दबाव आणला. या धक्क्यातून इंग्लंडची टीम अखेरपर्यंत सावरू शकली नाही. सुरुवातीला भारताचा स्विंग गोलंदाज भुवनेश्वरकुमार आणि शमी अहेमद यांनी शानदार गोलंदाजी केली. भुवनचे चेंडू इंग्रजांना समजले नाही. भुवनने अ‍ॅलेस्टर कुक, केविन पीटरसन, इयान मोर्गन या दिग्गजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. नंतरच्या षटकांत अश्विन बहरला. त्याने इंग्लंडचे केसवेटर, ट्रेडवेल आणि फिन यांना बाद केले. इंग्लंडकडून केविन पीटरसन (42), जे. रुट (36) आणि समीत पटेल (नाबाद 30) यांच्याशिवाय इतरांनी निराशा केली.

भारतीय फलंदाजीत हेसुद्धा चमकले
धोनीने अवघ्या 66 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 72 धावा, रैनाने 78 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांसह 55 धावा काढल्या. विराट कोहलीने 54 चेंडूंत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 37, तर युवराजसिंगने 37 चेंडूंत पाच चौकारांच्या साहाय्याने 32 धावा जोडल्या. इंग्लंडकडून स्टीव्हन फिनने 51 धावांत, 2 तर डर्नबॅचने 73 धावांत दोन गडी बाद केले. वोक्स आणि ट्रेडवेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
चांगल्या भागीदा-या
सहाव्या विकेटसाठी धोनी आणि जडेजाने 96 धावांची, पाचव्या विकेटसाठी रैना-धोनीने 55 धावांची, तिस-या विकेटसाठी युवराज आणि कोहलीने 53 धावांची, तर चौथ्या विकेटसाठी कोहली आणि रैनाने 48 धावांची भागीदारी केली. गंभीर (8) आणि रहाणे (4) फ्लॉप ठरले.