आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धवन, रहाणेमुळे भारत 'अजिंक्य', श्रीलंकेवर १६९ धावांनी मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कटक - सलामीवीर शिखर धवनच्या ११३ आणि अजिंक्य रहाणेच्या १११ धावांच्या शतकी खेळीनंतर ईशांतच्या ४ विकेटच्या बळावर भारताने श्रीलंकेला मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात १६९ धावांनी चीत केले. धवन-रहाणेच्या दमदार फलंदाजीने २३१ धावांची दणकट भागीदारी करून भारताला ५ बाद ३६३ धावांचा बलाढ्य स्कोअर उभा करून दिला. प्रत्युत्तरात पाहुण्या श्रीलंकेला भारतीय गोलंदाजांसमोर ३९.२ षटकांत सर्वबाद १९४ धावाच काढता आल्या. भारतीय फलंदाजांनंतर गोलंदाजांनीसुद्धा लंकेला हैराण केले. आता मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना ६ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होईल.

रहाणे-धवनने गाजवला दिवस
भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी एकत्र शतक ठोकण्याची ही तिसरी वेळ ठरली. यापूर्वी सौरव आणि सचिन तेंडुलकर यांनी हा पराक्रम दोन वेळा केला. घरच्या प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या बाराबती स्टेडियमवर श्रीलंकेने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस बोलावले. लंकेचा कर्णधार मॅथ्यूजचा हा निर्णय चुकलाच. भारताची सलामी जोडी रहाणे आणि धवन यांनी तब्बल २३१ धावांची सलामी देऊन श्रीलंकेच्या गोलंदाजीची हवाच काढून टाकली. रहाणेने १०८ चेंडूंत १३ चौकार आणि २ षटकारांसह १११ धावा ठोकल्या. दुसरीकडे धवननेसुद्धा आपल्या जबरदस्त फॉर्मचे उदाहरण सिद्ध करताना १०७ चेंडूंत १४ चौकार आणि ३ षटकारांसह ११३ धावा चोपल्या. तिस-या क्रमांकावर आलेल्या सुरेश रैनानेसुद्धा प्रेक्षकांना निराश केले नाही. रैनाने अवघ्या ३४ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. धोनीच्या अनुपस्थितीत नेतृत्व करणा-या कोहलीने २१ चेंडूंत २ चौकार खेचत २२ धावा काढल्या. अंबाती रायडूने २७ धावांचे योगदान दिले. वृद्धिमान साहाने नाबाद १० व अक्षर पटेलने नाबाद १४ धावा काढल्या.

श्रीलंकेला पहिले यश धवनच्या रूपात मिळाले. धवनला अशान प्रियंजनने त्रिफळाचीत केले. थोड्या वेळाने रहाणेसुद्धा बाद झाला. त्याला सूरज रणदीवने महेला जयवर्धनेकरवी झेलबाद केले. रैनालासुद्धा रणदीवने पायचीत केले. रायडू पाचव्या आणि अखेरच्या फलंदाजाच्या रूपात बाद झाला. लंकेकडून रणदीवने ३ गडी बाद केले.

श्रीलंकेची वाईट सुरुवात
धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. अनुभवी सलामीवीर दिलशान १८ धावांवर उमेश यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. तिस-या क्रमांकावर आलेला माजी कर्णधार कुमार संगकारानेही निराशा केली. त्याने १८ धावा काढल्या. उपुल थरंगाने २८ धावांचे योगदान दिले.

एकही अर्धशतक नाही
भारतीय गोलंदाजांसमोर लंकेने सपशेल गुडघे टेकले. लंकेकडून एकाही खेळाडूला अर्धशतकसुद्धा ठोकता आले नाही. त्यांच्याकडून माजी कर्णधार महेला जयवर्धनेने सर्वाधिक ४३ धावा काढल्या. त्यानंतर टी. परेराने २९ आणि सलामीवीर थरंगाने २८ धावांचे योगदान दिले.

ईशांत शर्माच्या ४ विकेट
भारताकडून गोलंदाजीत ईशांत शर्माने शानदार गोलंदाजी केली. त्याने ८ षटकांत एक निर्धाव टाकताना ३४ धावांत ४ गडी बाद केले. ईशांतने संगकारा, प्रियंजन, रणदीव आणि धम्मिका प्रसाद यांना टिपले. याशिवाय भारताकडून युवा खेळाडू अक्षर पटेलने २४ धावांत २ गडी आणि उमेश यादवनेसुद्धा २४ धावांतच २ विकेट घेतल्या. आर. अश्विनने एक गडी आणि सुरेश रैनाने एकाला टिपले.
पुढे पाहा धावफलक...