आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन ट्रॉफी : सराव सामन्यात भारताची श्रीलंकेवर मात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एजबस्टन - भारतीय संघाने शनिवारी चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या तयारीसाठी झालेल्या सराव सामन्यात श्रीलंकेचा 5 गड्यांनी पराभव केला. विराट कोहली (144) आणि दिनेश कार्तिक (106*) यांनी केलेल्या 186 धावांच्या भागीदारीच्या बळावर भारताने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने तीन बाद 333 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 337 धावा काढल्या. कार्तिकने 81 चेंडूंत 12 चौकार व दोन षटकार ठोकून नाबाद शतक ठोकले.


धावांचा पाठलाग करणा-या भारताची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर शिखर धवन (1) धावबाद होऊन तंबूत परतला. तिस-या क्रमांकावर आलेल्या विराट कोहलीने संघाची बाजू सावरली. त्याने मुरली विजयसोबत दुस-या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली. दरम्यान, इरंगाने एम.विजयला (18) झेलबाद केले. त्यापाठोपाठ रोहित शर्मा 5 धावा काढून परतला. त्यानंतर कोहलीने सुरेश रैनासोबत चौथ्या गड्यासाठी 48 धावांची भागीदारी करून संघाच्या धावसंख्येला गती दिली. मात्र, सेनानायकेने ही जोडी फोडली. त्याने रैनाला त्रिफळाचीत केले. रैनाने 31 चेंडूंत चार चौकार ठोकून 34 धावा काढल्या. त्यानंतर कार्तिक व धोनीने (18*) अभेद्य 41 धावांची भागीदारी करून विजयश्री खेचून आणली.


प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या श्रीलंका संघाच्या सलामीवीर कुशल परेरा आणि तिलकरत्ने दिलशानने दमदार फलंदाजी केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी केली. दोघेही रिटायर्ड होऊन तंबूत परतले. परेराने 94 चेंडूंत सात चौकार व तीन षटकारांसह 82 धावा काढल्या. दिलशानने 78 चेंडंूत नऊ चौकार व एक षटकार ठोकून 84 धावांची खेळी केली. त्यानंतर जयवर्धने 30, संगकारा 45 आणि दिनेश चांदिमलने 46 धावा काढल्या. भारताकडून भुवनेश्वर, ईशांत शर्मा व मिश्राने प्रत्येकी एक विकेट घेतली.


विराट कोहलीचा झंझावात
भारतीय संघाच्या विराट कोहलीने सराव सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजीला फोडून काढले. त्याने झंझावाती 144 धावांची फलंदाजी करून भारताचा विजयाचा मार्ग सोपा केला. त्याने 123 चेंडंूचा सामना करताना 11 चौकार व 3 षटकारांसह सर्वाधिक 144 धावा काढल्या. या वेळी त्याने दिनेश कार्तिकसोबत सहाव्या विकेसाटी 186 धावांची भागीदारी केली.


भारत-ऑस्ट्रेलिया सामना मंगळवारी
चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी भारतीय संघ कार्डिफ येथे मंगळवारी ऑस्ट्रेलियासोबत दुसरा सराव सामना खेळणार आहे. दुसरीकडे वेस्ट इंडीज व श्रीलंका यांच्यात सामना होईल. उद्या सोमवारी पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका यांच्यात सराव सामना खेळवला जाईल.


संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : 3 बाद 333 धावा (के. परेरा 82, दिलशान 84, जयवर्धने 30, संगकारा 45, चांदिमल 46) पराभूत वि. भारत : 5 बाद 337 धावा (कोहली 144, रैना 34, कार्तिक नाबाद 106, धोनी नाबाद 18*, 2/60 इरंगा)