आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India First Time Win Gold Medal In Wrestling At Asian Games, Divya Marathi

सुवर्ण जिंकून योगेश्वरचा इतिहास, एशियन कुस्तीत २८ वर्षांनंतर भारताने जिंकले सुवर्णपदक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - लंडन ऑलिम्पिक पदक विजेता आणि ग्लासगो कॉमनवेल्थचा विजेता योगेश्वर दत्तने १७ व्या एशियन गेम्समध्ये इतिहास रचताना २८ वर्षांनंतर भारताला कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकून दिले. योगेश्वरने फायनलमध्ये तजाकिस्तानचा तगडा मल्ल जालिम खान युसुपोवला अत्यंत रोमांचक लढतीत १-० ने नमवले. सुवर्णपदक जिंकल्यानंतर योगेश्वरने तिरंगा फडकावून स्टेडियमला फेरफटका मारला. योगेश्वरच्या आधी १९८६ च्या सेऊल एशियन गेम्समध्ये करतार सिंग यांनी सुवर्णपदक जिंकले होते.

योगेश्वर सेमीफायनलमध्ये चीनच्या कतई यीरलेनबिके याला ५-७ अशा अंतराने मागे पडल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करून चीत केले. फायनलमध्ये युसूपोवने भारतीय मल्लाला तगडे आव्हान दिले. मात्र, योगेश्वरने शानदार डिफेन्स करताना युसुपोवला स्वत:वर वरचढ होण्याची संधी दिली नाही.

योगीकडे होती एका गुणाची आघाडी
योगी नावाने सुप्रसिद्ध भारतीय मल्लाकडे फक्त एका गुणाची आघाडी होती. सलग सामने लढल्यामुळे योगेश्वर थोडा थकल्यासारखा दिसत होता. मात्र, युसुपोव आपल्याला एकही संधी देणार नाही, याची जाणीवसुद्धा योगीला होती. योगेश्वरने युसुपोववर डाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधी मल्ल वाचला. सामना अखेरच्या क्षणात पोहोचला व चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. युसुपोवला एक गुण मिळाला असता तर तो जिंकला असता व भारताचे स्वप्न भंगले असते. युसुपोवने अखेरच्या क्षणात योगेश्वरला डावात अडकवले. मात्र, पंचांनी सामना संपल्याची घोषणा करताना तमाम भारतीय चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

सेमीफायनलमध्ये दमदार मात
आपल्या वयापेक्षा आठ वर्षे लहान चिनी मल्लाविरुद्ध योगीची सुरुवात संथ होती. चीन मल्लाने योगीला डावात अडकवताना दोन गुण मिळवले.

मेरी कोम, सरिता, पूजा उपांत्य फेरीत
पाच वेळची वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोमसह सरिता देवी आणि पूजा राणीने आशियाई स्पर्धेच्या बॉक्सिंग प्रकारातील भारताची तीन पदके निश्चित केले. या महिला खेळाडूंनी उपांत्य फेरी गाठली. पुरुष गटात एल. देवेंद्राने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्याने पहिल्या फेरीत बोनफोनचा पराभव केला. मेरी कोमने ४८-५१ किलो वजन गटात चीनच्या सी. हेइजुआनचा पराभव केला. सरिताने मंगोलियाच्या एर्डीन आेयुनगेरेलचा ५७ किलो वजन गटा त पराभव केला. भारताच्या पूजा राणीने तैवानच्या शेन डारा फ्लोराला धूळ चारली.

टेनिसमध्ये भारताला तीन कांस्यपदके
अमेरिकन ओपनमधील मिश्र दुहेरीची चॅम्पियन सानिया मिर्झाने सोलापूरच्या प्रार्थना ठोंबरेसोबत आशियाई स्पर्धेच्या टेनिसमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले. टेनिसमध्ये भारताने नवव्या दिवशी दबदबा कायम ठेवत ३ कांस्यपदके आपल्या नावे केली. तसेच दोन सुवर्ण वा दोन रौप्यपदके निश्चित केली आहेत.आता सानिया व साकेत मेनानी, सनम व साकेत मेनानी हे सुवर्णपदकासाठी खेळणार आहेत.

गत पुरुष दुहेरीचा चॅम्पियन सनम सिंगने साकेत मेनानीसोबत उपांत्य लढतीत थायलंडच्या संचई रतिवताना आणि सोंचेत रतिवतानाचा ४-६, ६-३, १०-६ ने पराभव केला.
सानिया-साकेत फायनलमध्ये : साकेतने सानियासोबत मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये प्रवेश केला. भारताच्या या जोडीने ५८ मिनिटांत जेई झेंग-जी झांगचा ६-१, ६-३ अशा फरकाने सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.

सानिया-प्रार्थनाची झुंज अपयशी
सानिया व प्रार्थना ठोंबरेने महिला दुहेरीत १ तास ३५ मिनिटे दिलेली झुंज अपयशी ठरली. त्यामुळे या जोडीला कांस्यवर समाधान मानावे लागले. या जोडीला तैवानच्या वेई चान व सुन वेई सीहने ७-६, २-६, १०-४ ने धूळ चारली. युवा खेळाडू युकी भांबरीने पुरुष एकेरी व दुहेरीच्या गटात कांस्यपदकाची कमाई केली. त्याला एकेरीत योशिहितो निशियोकाने धूळ चारली. तसेच युकीचा दिविज शरणसोबत पराभव झाला.
(छायाचित्र - पुरुषांच्या ६५ किलो वजन गटाच्या कुस्तीतील अंतिम सामन्यात तजाकिस्तानच्या जालीम खान युसुपोवला चीतपट करण्याच्या प्रयत्नात भारताच्या योगेश्वर दत्तची रंगलेली चुरस)