आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Get More Silver Medal In Asian Atheletics Game

आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा: भारताचा रौप्यपदकाचा डबल धमाका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - येथील 20 व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या समरजित, प्रेमकुमार, सुधासिंग आणि हेमश्रीने शुक्रवारचा दिवस गाजवत पदकांचा धमाका केला. लांब उडीत प्रेमकुमार के. व 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुधासिंग हिने रौप्य, तर भालाफेकमध्ये समरजित व 110 मीटर हर्डल्समध्ये हेमाश्री जे. हिने कांस्यपदक मिळविले. भारताच्या पदकांची संख्या नऊ झाली आहे. 24 वर्षीय समरजितने 74.80 मीटर भालाफेक करून कांस्यपदक पटकावले.


सुधासिंग दुस-या स्थानावर
गेल्या आशियाई स्पर्धेतील रौप्य पदक विजेत्या सुधासिंगने पुण्यात पुनरावृत्ती करीत 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये भारतासाठी रौप्य पदक मिळवून दिले. तिने 9:56.27 मिनिटांची वेळ नोंदवली. बहारीनच्या रुथ जेबेट हिने 9:40.84 मिनिटांची वेळ नोंदवत सुवर्ण निश्चित केले. कोरियाच्या कुम ह्यांग हिने 10:09.80 मिनिटांची वेळ नोंदवत कांस्य पदक मिळविले.


हेमाश्रीला नशिबाने कांस्य
हेमाश्री जे. हिने दिवसभरात भारताला कांस्यच्या रूपाने तिसरे पदक मिळवून दिले. अवघी 21 वर्षीय हेमाश्रीकडून भारताला हा अनपेक्षित पण सुखद धक्का आहे. मात्र, हे पदक तिला नशिबानेच मिळाले. स्पर्धा सुरू झाल्यानंतर जपान आणि कझाकिस्तानच्या दोन खेळाडूंनी स्टार्ट चुकवल्यामुळे दोन वेळा शर्यत पुन्हा घ्यावी लागली होती. तिस-या वेळी स्पर्धा पूर्ण केली तेव्हा हेमाश्री पाचव्या स्थानावर राहिली. सर्वांत पुढे जपानची हितोमी शिमुरा, कझाकिस्तानची अनास्तासिया पिलीपेंक होती. अन्य दोन खेळाडूही याच दोन्ही देशांच्या होत्या. मात्र, तिस-यांदा स्टार्ट चुकविल्याने हितोमी अणि पिलीपेंक या दोघींना बाद ठरविण्यात आले. त्यामुुळे हेमाश्रीचे स्थान वर सरकत तिस-या क्रमांकावर आले आणि कांस्यपदकाची माळ गळ्यात पडली. भारताचीच खेळाडू गायत्री जी. सहाव्या स्थानावर होती, ती चौथ्या स्थानावर आली. हेमाश्रीने 14.01 सेकंदांची वेळ नोंदवली. जपानची आयुका किमुरा हिने 13.25 सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदकाचा वेध घेतला. कझाकिस्तानची अनास्तासिया सोप्रुनोव्ह (13.44 सेकंद) हिने रौप्यपदक मिळविले.


रौप्यवान कामगिरीने जिंकले प्रेम
भारताचा तिसरा दिवस प्रेमकुमारमुळे रौप्यवान ठरला. त्याने लांब उडीत 7.92 मीटरची कामगिरी नोंदवली, जी त्याची मोसमातली सर्वोच्च् कामगिरी ठरली. मात्र त्याचे सुवर्णपदक अवघ्या तीन सेंंटिमीटरने हुकले. चीनचा वँग जियानन याने 7.95 मीटरची उडी घेत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. या गटात चीनच्याच टँग गोंगचेन (7.89 मी.) याने कांस्यपदक मिळविले.


तपश्चर्या फळाला
भालाफेकमध्ये भारताला 13 वर्षांनंतर समरजितने पदक मिळवून दिले. त्याने आशियाई स्पर्धेत कांस्य पटकावले. यापूर्वी 2000 मध्ये गुरमित कौरच्या रूपाने एकमेव पदक मिळाले होते. त्याने सुवर्णपदक मिळवले होते.


पदकतालिका
देश सुवर्ण रौप्य कांस्य
चीन 8 3 2
बहरीन 4 4 1
उझबेकिस्तान 3 3 1
सौदी अरेबिया 3 0 0
जपान 2 2 6
भारत 1 3 5