मुंबई - आयसीसी कसोटी क्रमवारीत 102 गुणांसह चौथ्या क्रमांकावर असलेली टीम इंडिया आणि 100 गुणांसह पाचव्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडला बुधवारपासून सुरू होणार्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्रमवारी उंचावण्याची संधी आहे.
भारताने कसोटी मालिका जिंकली तर पाकिस्तानला मागे सारून त्यांना तिसरा क्रमांक पटकावता येईल. इंग्लंडला तिसर्या क्रमांकावर झेप घ्यायची असल्यास भारताला 5 सामन्यांच्या मालिकेत किमान दोन कसोटी विजयांच्या फरकाने हरवावे लागेल. एका विजयाने मालिका जिंकल्यास इंग्लंड चौथ्या स्थानावर येऊ शकेल.
दोन्ही संघांना क्रमवारीतील बढतीपेक्षाही मोठ्या घसरगुंडीचाही धोका आहे. भारताकडून 5-0 असा सपाटून मार खाल्ल्यास कूकचा इंग्लंड संघ सातव्या स्थानी फेकला जाईल. 4-1 असा भारताचा विजय इंग्लंडला सहाव्या स्थानावर नेऊ शकेल. इंग्लंडने मालिका 4-0 किंवा त्यापेक्षा अधिक चांगल्या फरकाने जिंकल्यास भारताची सातव्या स्थानी जाण्याइतपत अधोगती होईल.
अनुभवानेच नेतृत्वाचा आत्मविश्वास वाढला
खेळातील अनुभवांमुळेच जगातील सर्वोत्तम क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्याचा आत्मविश्वास वाढला असल्याची भावना टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केली आहे. इंग्लंडविरुद्ध 9 जुलैपासून खेळल्या जाणार्या कसोटी मालिकेपूर्वी एका मुलाखतीदरम्यान त्याने आपल्या कारकीर्दीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. 33 वर्षीय धोनीचा सोमवारी वाढदिवस होता.