नवी दिल्ली - विश्वचषकाचा शुभारंभ अवघ्या आठवडाभरावर आला असूनही अद्याप
आपल्याला मुख्य भारतीय संघ ठरवता आलेला नाही. तसेच अगदी अखेरच्या टप्प्यातही भारतीय संघ त्यांच्या दुखापतींनाच कुरवाळत बसलेला असून आता या सर्व बाबींना खूपच उशीर झाला असल्याचे भारताचे माजी कप्तान बिशनसिंग बेदी यांनी म्हटले आहे.
भारतीय संघातील जखमी खेळाडू असलेले रोहित शर्मा, भुवनेश्वरकुमार, रवींद्र जडेजा आणि ईशांत शर्मा यांच्या तंदुरुस्तीबाबतची अंतिम चाचणी ७ फेब्रुवारीला होणार आहे. भारताच्या वॉर्मअप सामन्यांच्या अगदी आदल्या दिवशी या चाचण्या होणार असून हे उशिराचे अगदी टोक असल्याचे मत बेदी यांनी व्यक्त केले आहे. तसेच भारतीय संघात स्थिर असणार्या खेळाडूंची संख्या केवळ पाच ते सहा असून प्रत्येक सामन्यात तितक्याच खेळाडूंची अदलाबदल हे केवळ अनाकलनीय आहे. परिस्थितीनुसार किंवा दुखापतीमुळे एक-दोन खेळाडूंची अदलाबदल समजू शकते, मात्र प्रत्येक वेळी अर्धा संघ बदलणे आतापर्यंत कधीही झाले नव्हते, असेही ते म्हणाले.
भारतासाठी जेतेपद राखण्याचे आव्हान आहे. यंदाच्या उपांत्य फेरीत पोहोचणार्या चार संघांची नावे सांगणेदेखील खूपच अवघड आहे, असेही ते म्हणाले.