आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Medal less On Fourth Day Of Asian Athletics Championships

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताचे हात रिकामे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुणे येथील बालेवाडीत सुरू असलेल्या 20 व्या आशियाई अँथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताचे हात रिकामे राहिले. एकाही भारतीय खेळाडूला पदक मिळवता आले नाही. मात्र, चिनी महिलांनी चार सुवर्ण मिळवत दिवस गाजविला. पोल व्हॉल्टमध्ये चीनच्या ली लिंग हिने स्पर्धा विक्रम नोंदविला, तर वेगावरही हुकूमत गाजवत चिनी महिला-पुरुषांनी 4 बाय 100 मीटर रिले स्पर्धेत सुवर्णझेप घेतली. दरम्यान, रविवारी स्पर्धेचा समारोप होणार असून, 12 सुवर्णपदकांचा फैसला होणार आहे.

भारताचे हात रिकामे
भारताने 400 मीटर हर्डल्स, 800 मीटर आणि 200 मीटरमध्ये अंतिम फेरी गाठली. मात्र, शनिवारी झालेल्या महिला गटातील पोलव्हॉल्ट, गोळाफेक, तर पुरुष गटातील हातोडाफेकमध्ये भारतीय पदकांपासून वंचित राहिले. तीन प्रकारांत भारतीय खेळाडूंचे हात रिकामे राहिल्याने रविवारच्या गोल्डन डेवर भारताची मदार असेल.

चीनची हुकूमत
स्पर्धेचा चौथा दिवस लाल दिवस ठरला. पोलव्हॉल्टमध्ये चीनची ली लिंग हिने स्पर्धा विक्रम नोंदविताना 4.54 मीटरची नोंद करीत सुवर्णपदक मिळवले. चीनच्याच रेन मिंगकियान (4.40) रौप्य, तर सुकन्या चोमच्युंडे (4.15) हिने कांस्यपदक मिळवले. भारताच्या ख्याती वखारिया व सुरेका व्ही. एस. या दोन्ही खेळाडू अनुक्रमे तळाच्या 8 व्या व 9 व्या स्थानी राहिल्या. 1998 मध्ये पोलव्हॉल्ट प्रकारात महिलांचा समावेश झाल्यापासून भारताला एकदाही पदक मिळवता आलेले नाही. चीनने शनिवारी 4 सुवर्णपदके मिळवली. 4 बाय 100 मध्ये दुहेरी सुवर्ण, तर गोळाफेकमध्ये ही चीनच्याच नावे सुवर्णपदक नोंदवले गेले.

200 मीटरमध्ये आव्हान संपुष्टात
स्पर्धेत 200 मीटर पुरुषांच्या गटात भारताचे आव्हान संपुष्टात आले. यात पाकिस्तानचा लियाकत अली याने अंतिम फेरी गाठली. हातोडा फेकीतही भारताला अपयश आले असून, या प्रकारात ताजिकीस्तानचा नाझारोव्ह दिलशोड याने 78.32 मीटर हातोडा फेकत सुवर्णपदक मिळवले. कुवेतच्या झेनकावी अली (74.70मी.) याने रौप्य, तर चीनच्या डकाई ओइ याने (74.19) कांस्यपदक मिळवले. भारताचा चंद्रोदय सिंग 8 व्या स्थानी राहिला. त्याने 67.42 मीटरपर्यंतच हातोडा फेकला, तर कमलप्रीत सिंगनेही निराशा केली. तो 11 व्या स्थानी घसरला.

हर्डल्समध्ये सतिंदर अंतिम फेरीत
स्पर्धेच्या 400 मीटर हर्डल्समध्ये (अडथळा शर्यत) भारताच्या सतिंदर सिंगने क्रीडाप्रेमींच्या अपेक्षा पूर्ण करताना पहिल्या हिटमध्ये दुसरा क्रमांक घेत अंतिम फेरी गाठली. 300 मीटरपर्यंत तो आघाडीवर होता. मात्र, जपानच्या यासुहिरो फुएकी याने जोरदार मुसंडी मारत पहिल्या स्थानावर झेप घेतली. एकूण तीन हिटमधून पहिले दोन खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. दुसर्‍या हिटमध्ये जतीन पॉल आघाडीवर असतानाही त्याला तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

दुती चाँद, आशा रॉयने आव्हान राखले
200 मीटर महिलांमध्ये भारताच्या दुती चाँद व आशा रॉयने भारताचे आव्हान कायम ठेवत अंतिम फेरी गाठली. पहिल्या हिटमध्ये दुतीने दुसरे, तर तिसर्‍या हिटमध्ये आशाने प्रथम क्रमांक मिळवला. आपादमस्तक काळ्या पोशाखात धावणारी इराणची मरियम तुसी हिने पहिल्या हिटमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. दुसर्‍या हिटमध्ये मात्र भारताच्या स्रबानी नंदा तिसर्‍या स्थानावर राहिल्याने तिचे आव्हान संपुष्टात आले.

आज लावणीच्या धडाक्यात समारोप
पुण्यातील बालेवाडीत 3 जुलैपासून सुरू असलेल्या 20 व्या आशियाई अँथलेटिक्स स्पर्धेचा रविवारी सायंकाळी 7 वाजता लावणी, गोंधळी नृत्यांसह विविध कार्यक्रमांनी समारोप होणार आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री जितेंद्र सिंग, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत समारोप सोहळा होईल. क्रीडामंत्री पद्माकर वळवी, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, क्रीडा राज्यमंत्री उदय सामंत आदी प्रमुख पाहुणे असतील.