अॅडिलेड - ऑस्ट्रेलिया दौर्यातील
आपल्या पहिल्या सराव सामन्यात पाच भारतीय खेळाडूंनी अर्धशतके ठोकली. कांगारूंच्या भूमीवर "हम भी कुछ कम नहीं' असे म्हणत भारतीयांनी आपला दमदार फॉर्म दाखवला. भारताकडून
विराट कोहली, वृद्धिमान साहा, चेतेश्वर पुजारा, मुरली विजय आणि कर्ण शर्मा यांनी अर्धशतके ठोकली. भारत आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हनचा सामना अनिर्णीत अवस्थेत सुटला. या सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत चांगली कामगिरी केली. दोन्ही संघांदरम्यान आता दुसरा सराव सामना २८ ते २९ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. पहिल्या कसोटीला ४ डिसेंबरपासून सुरुवात होईल.
भारताला आपल्या डावात दुसर्या आणि अखेरच्या दिवशी ९१ षटकांत ८ बाद ३६३ धावा काढल्या. तत्पूर्वी, भारतीय संघाने सकाळी १ बाद ५५ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यावेळी सलामीवीर मुरली विजय ३२ आणि चेतेश्वर पुजारा १३ धावांवर खेळत होते. मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे रिटायर्ड हर्ट झाले. मुरली विजयने ८२ चेंडूंचा सामना करताना ८ चौकारांच्या मदतीने ५१ धावा काढल्या. पुजाराने िनवृत्त होण्यापूर्वी ८० चेंडूंत ११ चौकारांसह ५५ धावांची खेळी केली. मुरली विजयने दुसर्या विकेटसाठी पुजारासाठी महत्त्वपूर्ण अशी ८५ धावांची भागीदारी केली. भारताने सराव सामन्यात चांगली तयारी केली.
विराट कोहली फॉर्मात
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले. त्याने सर्वाधिक ६० धावा काढल्या. विराटने ११४ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार मारले. त्याने सुरेश रैनासोबत (४४) सहाव्या विकेटसाठी ५५ धावांची अर्धशतके भागीदारी केली. यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने सुद्धा तळाला चांगली फलंदाजी केली. त्याने नाबाद ५६ धावा काढल्या. दहाव्या क्रमांकाचा फलंदाज कर्ण शर्माने नाबाद ५६ धावांचे योगदान दिले. साहा आणि कर्ण शर्मा यांनी नवव्या विकेटसाठी ७८ धावांची अभेद्य भागीदारी केली.