आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला वर्ल्डकप : मिताली राजच्या नाबाद शतकामुळे भारताची पाकिस्तानवर मात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कटक- महिला विश्वकरंडक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सातव्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. कर्णधार मिताली राजने नाबाद 103 धावांची खेळी करीत भारताला विजय मिळवून दिला. तसेच या विजयाबरोबरच विश्वकरंडक स्पर्धेत भारताला सातवे स्थान मिळाले.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करीत भारतापुढे 193 धावांचे आव्हान दिले होते. त्याचा पाठलाग करताना भारताने 46 षटकात 4 बाद 195 धावा केल्या. कर्णधार मिताली राजने 141 चेंडूचा सामना करताना 13 चौकार 1 षटकारासह नाबाद 103 धावा केल्या तर, रिमा मल्होत्राने नाबाद 25 धावा काढत मितालीला चांगली साथ दिली तसेच विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी सलामीवीर पूनम राऊत (4) आणि कामिनी (26) धावांवर बाद झाली. हरमनप्रीत कौर 16 धावांवर धावबाद झाली. तर, सुलक्षणा नाईक 3 धावांवर त्रिफळाचित झाली.

आज सकाळी फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने निर्धारित 50 षटकात 7 बाद 192 धावापर्यंत मजल मारली होती. नयन अबिदी (58) आणि मध्यल्या फळीतील फलंदाज निदा दार (68) यांच्या दमदार अर्धशतकांमुळे पाकिस्तानने दोनशेच्या घरात मजल मारली. भारताकडून झूलन गोस्वामीने 17 धावांत 2 तर, निरंजना हिने 35 धावांत 3 गडी टिपले.

भारत आणि पाकिस्तानचा महिला संघ या विश्वकरंडक स्पर्धेच्या सुपरसिक्स फेरीत प्रवेश करु शकले नाही. भारत 'अ' गटात तर पाकिस्तान 'ब' गटात तळाला राहिले होते. त्यामुळे या दोन सातव्या क्रमांकासाठी आज सामना खेळविण्यात येत आहे. 'अ' गटातून इंग्लंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज यांनी सुपरसिक्सची फेरी गाठली. तर, 'ब' गटातून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांनी प्रवेश केला आहे.