आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs Aus: Ravindra Jadeja Thrilled To Dismiss Michael Clarke

जडेजाच्या फिरकीने कांगारूंना वेसण; ऑस्ट्रेलियाच्या 7 बाद 273 धावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली - पाहुण्या ऑस्ट्रेलिया टीममधील आत्मविश्वासाचा अभाव चेन्नई, हैदराबादपाठोपाठ आता मोहाली कसोटीतही जगजाहीर झाला. कांगारूने दुसर्‍या सत्रात तीन व तिसर्‍या सत्रात चार गडी गमावले. दुसर्‍या दिवसअखेर पाहुण्या टीमने सात गड्यांच्या मोबदल्यात 273 धावा काढल्या. एड कोवानने 86, डेव्हिड वॉर्नरने 71 आणि स्टीव्हन स्मिथने नाबाद 58 धावांचे योगदान दिले. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन आणि ईशांत शर्माने दोन विकेट घेतल्या. प्रज्ञान ओझा व आर. अश्विनला प्रत्येकी एक गडी बाद करता आला.

ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध कसोटी मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे. कांगारू टीमने तिसर्‍या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. दुसर्‍या दिवसाच्या खेळाला लवकर सुरुवात झाली आणि 104 षटके दिवसभरात टाकली गेली. पहिल्या डावात सात गडी गमावल्याने ऑस्ट्रेलिया टीमवर दबाव असल्याचे दिसून येत आहे.

सलामीवीरांची शतकी भागीदारी- ऑस्ट्रेलियाने पहिल्या विकेटसाठी 139 धावांची भागीदारी केली. मात्र, स्पिनर रवींद्र जडेजाने 48 व्या षटकात सलग दोन चेंडूंवर वॉर्नर व क्लार्कच्या महत्त्वाच्या विकेट घेतल्या. त्यानंतर वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने 94 व्या षटकात हॅडीन आणि हेनरिक्सला बाद करून पाहुण्यांना अडचणीत आणले.

कोवान, वॉर्नरशिवाय स्टीव्हन स्मिथने अर्धशतकी खेळी केली. कोवानने 238 चेंडूंत 86 धावा, आठ चौकार ठोकले. वॉर्नरने 147 चेंडंत नऊ चौकारांच्या साहाय्याने 71 धावा काढल्या. स्टीवन स्मिथ दिवसअखेर 137 चेंडंूत सात चौकार व एक षटकार मारून नाबाद 58 धावा काढून मैदानावर खेळत आहे. त्याच्यासोबत स्टार्क 20 धावांवर टिकून आहे.

जडेजाकडून चौथ्यांदा क्लार्कची शिकार
रवींद्र जडेजाने मालिकेत चौथ्यांदा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कची शिकार केली. त्याने यापूर्वी चेन्नई व हैदराबाद कसोटीतही क्लार्कला बाद केले होते. शुक्रवारी क्लार्क पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात जडेजाच्या चेंडूवर धोनीकरवी यष्टिचीत झाला.

धोनीचे असेही अर्धशतक
कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका वेगळ्या कामगिरीत अर्धशतक झळकावले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत यष्टी पाठीमागे 50 बळी घेण्याची उल्लेखनीय कामगिरी करणारा तो पहिला भारतीय यष्टिरक्षक ठरला. त्याने शुक्रवारी कांगारू टीमचा कर्णधार क्लार्कला असे बाद करून हे अर्धशतक पूर्ण केले.

डावपेच अपयशी
कर्णधार मायकेल क्लार्कने फलंदाजीच्या क्रमवारीत बदल केला होता. तो तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. तिसर्‍या क्रमांकावर येणार्‍या फिल हुजला चौथ्या क्रमांकावर पाठवले. त्याचे हे दोन बदल यशस्वी ठरले नाही. तो शून्यावर व ह्युज दोन धावा काढून परतला.