आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- भारत आणि ऑस्ट्रेलियात शुक्रवारपासून फिरोजशहा कोटला मैदानावर चौथ्या कसोटीला सुरुवात होत आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 3-0 ने पुढे आहे. आणखी एका विजयाने ऑस्ट्रेलियाला 4-0 ने नमवीत नवीन विक्रम रचण्याची संधी धोनीच्या संघाकडे असेल. ऑस्ट्रेलियाने यजमान भारताकडून चेन्नई कसोटीत 8 गड्यांनी, हैदराबादेत एक डाव आणि 135 धावांनी, तर मोहालीत 6 गड्यांनी पराभवाचा सामना करावा लागला. 3-0 ने आघाडी घेऊन भारताने मालिका विजय साजरा केला आहे.
भारतीय फलंदाज रनमशीन : फलंदाजीत मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा रनमशीन ठरू शकतात. मुरली विजयने सलग दोन कसोटी शतके ठोकून आपली निवड सिद्ध केली. मोहलीचा हीरो शिखर धवन (187 धावा)च्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे किंवा सुरेश रैना यांच्यापैकी एकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. रैनाने अंतिम अकरा खेळाडूंत स्थान मिळवले, तर चेतेश्वर पुजारा मुरली विजयसोबत सलामीला खेळेल.
भारतीय फिरकीपटूंचे यश: दुसरीकडे या मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय फिरकीपटूंची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. भारतीय फिरकीपटू आर. अश्विन, रवींद्र जडेजा, प्रग्यान ओझा आणि हरभजनसिंग यांनी विकेट तर घेतल्याच, शिवाय गरजेच्या वेळी ईशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार हे वेगवान गोलंदाजही कामी आले.
कोटलाची खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल: फिरोजशहा कोटलाची खेळपट्टी नेहमी फिरकीपटूंना मदतगार ठरली आहे. भारतीय फिरकीपटूंनी तीन कसोटीत 48 बळी घेतले असून, आता कोटलावरही ऑस्ट्रेलिया समोरचे संकट कमी होण्याची शक्यता नाही. भारताच्या अश्विनने तीन कसोटीत 22 विकेट, जडेजाने 17 विकेट घेतल्या आहेत. दिल्ली कसोटीतही हे गोलंदाज रंग आणू शकतात.
क्लार्ककडून फिरकीपटूंची स्तुती - ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने टीम इंडियाचे शानदार प्रदर्शन आणि मालिका विजयाचे श्रेय फिरकीपटूंना दिले आहे. ‘कुरियर मेल’ मध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात भारतीय फिरकीपटू अव्वल दर्जाचे आहेत, असे त्याने म्हटले. त्यांचे फलंदाजसुद्धा द्विशतक, शतक आणि अर्धशतक ठोकत आहेत. दुसरीकडे आमच्याकडून फक्त एकच शतक झाले. येथील कोरड्या आणि अवघड खेळपट्टीवर खेळल्याने आमचा अनुभव भविष्यात कामी येईल. दिल्लीत चांगली कामगिरी होणार याचा विश्वास असल्याचे क्लार्कने म्हटले.
विजयासाठी प्रयत्न करू- दिल्लीत सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्याचे आमचे प्रयत्न असतील. या लढतीत प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण असतील, हे आताच सांगू शकत नाही. सामन्यापूर्वीच अंतिम अकरा खेळाडू कळतील.- मायकेल क्लार्क, सामन्याच्या पूर्वसंध्येला दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत.
भुवनेश्वर अधिक प्रभावी- ‘घरच्या मैदानावर थोडा जुना झाल्यानंतर माझा चेंडू स्विंग होतो. नव्या चेंडूने भुवनेश्वर इतका मी प्रभावी नाही. रिव्हर्स स्विंगसाठी मला चेंडू जुना होईपर्यंत थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागते.’- ईशांत शर्मा, वेगवान गोलंदाज.
ऑस्ट्रेलियाच्या अडचणी
- भारतीय फिरकीपटूंच्या दर्जाचा एकही स्पिनर पाहुण्यांकडे नाही. यामुळे यजमानांवर दबाव निर्माण करण्यात अपयशी.
- फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या तंत्राचा कांगारूंकडे अभाव.
- संघातील स्टार फलंदाजांना मोठी खेळी करता आलेली नाही. आतापर्यंत संघाकडून मालिकेत फक्त एकाच (मायकेल क्लार्क 130 धावा, चेन्नई) शतकाची नोंद झाली.
- शेन वॉटसन आणि क्लार्कच्या रूपात टीम दोन गटात विभागल्याचे दिसून येत आहे.
चार खेळाडूंचे निलंबन संपले- ऑस्ट्रेलियाचे चार खेळाडू शेन वॉटसन, जेम्स पॅटिंसन, मिशेल जॉन्सन आणि उस्मान ख्वाजा यांचे निलंबन संपले आहे. यातील वॉटसन, पॅटिंसन आणि जॉन्सन यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होऊ शकतो. पॅटिंसन मुख्य वेगवान गोलंदाज आहे.
वॉटसन-ऑर्थर यांच्यात संवाद वाढला- ऑस्ट्रेलियाचे कोच मिकी ऑर्थर आणि उपकर्णधार शेन वॉटसन यांनी भारताविरुद्ध होणा-या चौथ्या कसोटीपूर्वी गुरुवारी सरावादरम्यान प्रदीर्घ चर्चा केली. मात्र, बुधवारी सरावाच्या वेळी कोच ऑर्थर आणि कर्णधार मायकेल क्लार्क यांनी वॉटसनशी अंतर ठेवले होते. त्या वेळी संघात वादविवाद असल्याचे वृत्त चर्चेत होते. मात्र, गुरुवारी कोच-वॉटसन यांच्यात चर्चा झाली.
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मुरली विजय, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वरकुमार, प्रज्ञान ओझा, हरभजनसिंग, ईशांत शर्मा.
ऑस्ट्रेलिया : मायकेल क्लार्क (कर्णधार), कोवान, वॉर्नर, फिलिप ह्युजेस, शेन वॉटसन, उस्मान ख्वाजा, स्टिव्हन स्मिथ, ब्रेड हॅडिन, हेनरिक्स, मिशेल जॉन्सन, डोहर्ती, नॅथन लॉयन, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स पॅटिंसन, पीटर सिडल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.