Home »Sports »From The Field» India Vs Australia First Test Day 3 Rd Live

धोनीचे धडाकेबाज विक्रमी द्विशतक, भारत मजबूत स्थितीत

दिव्‍य मराठी वेब टीम | Feb 25, 2013, 06:14 AM IST

चेन्‍नई- कर्णधार धोनीने आक्रमक आणि संयमी खेळाचा समतोल साधत तुफानी द्विशतक ठोकले. भारताकडून द्विशतक ठोकणारा तो पहिलाच यष्‍टीरक्षक फलंदाज ठरला. तसेच धानीची ही खेळी ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध एका भारतीय कर्णधाराची सर्वोच्‍च वैयक्तीक धावसंख्‍याही आहे. धोनीने द्व‍िशतकी खेळीत 21 चौकार आणि 5 उत्तुंग षटकारांची आतषबाजी केली. दिवसाचा खेळ संपला त्‍यावेळी भारताने 8 बाद 515 धावा केल्‍या. तर 135 धावांची आघाडी घेतली आहे. धोनी 206 तर भुवनेश्‍वर कुमार 16 धावांवर नाबाद होता. सामन्‍यात दोन दिवस शिल्‍लक असून खेळपट्टी फिरकीला साथ देत आहे. उद्या डाव घोषित करुन ऑस्‍ट्रेलियाला डाव झटपट गुंडाळण्‍याचा धोनीचा प्रयत्‍न असू शकतो.

धोनीचे द्विशतक अतिशय वैशिष्‍ट्यपूर्ण आहे. भुवनेश्‍वर कुमारसोबत त्‍याने या खेळीदरम्‍यान नवव्‍या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. भागीदारीच्‍या 100 धावांमध्‍ये कुमारने केवळ 13 धावा केल्‍या. तसेच त्‍याने एकाच दिवसामध्‍ये द्विशतक पूर्ण केले. तो फलंदाजीला उतरल्‍यानंतर द्विशतक पूर्ण करेपर्यंत भारताने 312 धावा केल्‍या. त्‍यात धोनीचा वाटा 200 धावांचा आहे.

पॅटिंसनला चौकार मारून त्‍याने दिडशतक पूर्ण केले. त्‍यानंतर तो आक्रमक झाला. नॅथन लियॉनवर त्‍याने हल्‍ला चढविला. धोनीने भुवनेश्‍वर कुमारसोबत अर्धशतकी भागीदारी केली. त्‍यात कुमारचा वाटा केवळ 4 धावांचा होता. हरभजन सिंग बेजबाबदार फटका मारुन बाद झाला. परंतु, कुमारने डोके शांत ठेवून कर्णधाराला अतिशय मोलाची साथ दिली. भारताच्‍या आघाडीमध्‍ये ही भागीदारी अतिशय महत्त्वाची आहे.

तत्‍पूर्वी, धोनीने वेगवान गोलंदाज पीटर सिडलच्‍या चेंडूवर स्‍क्वेअर लेगला चौकार मारून करिअरमधले आपले सहावे शतक पूर्ण केले. शतकामध्‍ये त्‍याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला. धोनीने दीड वर्षानंतर कसोटीमधले आपले शतक पूर्ण केले. त्‍याने 14 नोव्‍हेंबर 2011 रोजी वेस्‍ट इंडीजविरूद्ध शेवटचे शतक ठोकले होते. त्‍याचबरोबर धोनीने कसोटीतील चार हजार धावाही पूर्ण केल्‍या.

अश्विन बाद झाल्‍यानंतर आलेल्‍या हरभजन सिंगला फलंदाजीत विशेष असे काही करता आले नाही. त्‍याने फक्‍त 11 धावा काढल्‍या. हेन्रीकेजने त्‍याचा त्रिफळा उडवला.

विराट कोहली बाद झाल्‍यानंतर सामन्‍याचा नूर पालटला. धोनीच्‍या साथीला आलेला रविंद्र जडेजा चाचपडत खेळत होता. जेम्‍स पॅटिंसनने त्‍याला चांगलेच सतावले. अखेर त्‍यानेच जडेजाचा त्रिफळा उडविला. चहापानापूर्वीच्‍या अर्धा तासामध्‍ये ऑस्‍ट्रेलियन वेगवान गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. धोनी आणि जडेजाला वेगाने धावा करु दिल्‍या नाही. जडेजा बाद झाल्‍यानंतर आलेल्‍या आर. अश्विनला जम बसण्‍याआधीच फिरकीपटू लॉयनने बाद केले. त्‍याने फक्‍त 3 धावा केल्‍या.

Next Article

Recommended