आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs Australia Hyderabad Test Day 1 Live Score

ऑस्‍ट्रेलियाच्‍या पहिल्‍या डावात 237 धावा, क्‍लार्कचे शतक हुकले; भारत बिनबाद 5 धावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - कर्णधार मायकल क्‍लार्कने चाणाक्षपणे ऑस्‍ट्रेलियाचा डाव घोषित केल्‍यानंतर पहिल्‍या दिवसाच्‍या अखेरची 3 षटके विरेंद्र सेहवाग आणि मुरली विजय यांनी सावधपणे खेळून काढली. भारताने दिवसअखेर बिनबाद 5 धावा केल्‍या होत्‍या.

मायकल क्‍लार्कने 9 बाद 237 धावांवर डाव घोषित केला. त्‍याची झुंझार खेळी रविंद्र जडेजाने संपुष्‍टात आणली. जडेजाने त्‍याचा 91 धावांवर त्रिफळा उडविला. क्‍लार्कने जडेजाला मोठा फटका मारण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु, तो चुकला आणि चेंडू थेट मिडल स्‍टपंवर आदळला. ऑस्‍ट्रेलियाला 4 बाद 63 अशा बिकट स्थितीतून क्‍लार्कने सावरले. त्‍यानंतर क्‍लार्कने पहिला डाव 9 बाद 237 धावांवर घोषित केला. पहिल्‍या दिवसाचा खेळ संपण्‍यास काही मिनिटे शिल्‍लक असताना 3 किंवा 4 षटके भारतीय सलामीवीरांना टाकून त्‍यांना बाद करण्‍याचा क्‍लार्कचा इरादा होता. परंतु, तसे घडले नाही. तरीही उद्या भारतीय सलामीवीरांना नव्‍याने सुरुवात करावी लागणार आहे. तसेच चेंडूही नवाच आहे. त्‍यामुळे सेहवाग-विजय जोडीसमोर खडतर आव्‍हान राहणार आहे.

क्‍लार्क आणि मॅथ्‍यू वेड यांची भागीदारी फुटल्‍यानंतर ऑस्‍ट्रेलियाच्‍या आणखी 3 विकेट्स झटपट पडल्‍या. रविंद्र जडेजाने पदार्पण करणा-या ग्‍लेन मॅक्‍सवेलला बाद करुन ऑस्‍ट्रेलियाला सातवा धक्‍का दिला. आखुड चेंडूला कट करण्‍याच्‍या प्रयत्‍नात मॅक्‍सवेलने धोनीच्‍या हातात झेल दिला. तो 13 धावा काढून बाद झाला. मॅक्‍सवेलने या कसोटीमध्‍ये पदार्पण केले आहे. तो यंदाच्‍या आयपीएल हंगामातील सर्वात महागडा क्रिकेटपटू ठरला आहे. त्‍यामुळे त्‍याच्‍याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्‍याने या डावात निराश केले.

मॅक्‍सवेल बाद झाल्‍यानंतर हरभजन सिंगने पीटर सिडलला पायचीत करुन कांगारुंना आठवा धक्‍का दिला. सिडल शुन्‍यावर बाद झाला.

क्‍लार्क आणि वेड यांनी शतकी भागीदारी करुन ऑस्‍ट्रेलियाचा डाव सावरला. ही भागीदारी हरभजन सिंगने मोडली. मॅथ्‍यू वेडला त्‍याने 62 धावांवर बाद केले. कट करण्‍याच्‍या प्रयत्‍नात उडालेला झेल भुवनेश्‍वर कुमारने सूर मारुन अप्रतिमरित्‍या टीपला. वेड आणि क्‍लार्कने 145 धावांची भागीदारी केली. त्‍यानंतर आलेला माझेस हेन्रिक्‍स 5 धावा काढून परतला. रविंद्र जडेजाने त्‍याचा त्रिफळा उडविला. जडेजाच्‍या अप्रतिम चेंडुवर तो बाद झाला.

दुसरीकडे मायकल क्‍लार्कने एक बाजू लावून धरली आहे. त्‍याने दमदार अर्धशतक केले. भुवनेश्‍वर कुमारने दिलेल्‍या तिहेरी दणक्‍यामुळे ऑस्‍ट्रेलियाची 4 बाद 63 अशी अवस्‍था झाली होती. परंतु, क्‍लार्क-वेड जोडीने भारताला आणखी यश मिळू दिले नाही.

अश्विनची फिरकी

ऑफ स्पिनर आर. अश्विनने फिलिप ह्यूजला बाद करत भारताला चौथे यश मिळवून दिले. चेन्नई कसोटी सामन्यात 12 गडी बाद करणा-या अश्विनने ह्यूजला कर्णधार धोनीकरवी झेल बाद केले. पहिल्याप्रयत्नात धोनीला झेल घेता आला नाही मात्र, त्याने दुस-यांदा ती चुक होऊ दिली नाही. ह्युज 19 धावांवर बाद झाला.

भुवनेश्‍वर सुसाट

तरुण गोलंदाज भुवनेश्वर कुमारने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. त्याने कांगारुंच्या दोन्ही सलामीवीरांना झटपट बाद केले. त्‍यानंतर धोकादायक शेन वॉटसनलाही तंबूत धाडले. भुवनेश्वर कुमारने शेन वॉटसनला पायचित केले. 23 धावा काढून वॉटसन बाद झाला.

भुवनेश्‍वरने त्याने पहिला बळी डेव्हिड वॉर्नरच्या रुपाने घेतला. सामन्याच्या तिस-याच षटकात त्याने वॉर्नरचा त्रिफळा उडविला. त्यानंतर पाहुण्‍या ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 5 धावा जोडल्या गेला नाही तर भुवनेश्वरने दुसरा सलामीचा फलंदाज कोवानलाही पायचित केले. वॉर्नर 6 आणि कोवान 4 धावा काढून तंबूत परतले.

नाणेफेक

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क नाणेफेकीत लकी ठरला. त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.