आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुजारा, मुरलीने कांगारूंचा बँड वाजवला; टीम इंडियांची आघाडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- चेतेश्वर पुजारा (162*) आणि मुरली विजय (129*) यांच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर भारताने दुसर्‍या कसोटीत विजयाकडे आगेकूच केली आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी भारताने 1 बाद 311 धावा ठोकल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 9 बाद 237 धावा काढल्या होत्या. भारताकडे आता पहिल्या डावात 74 धावांची आघाडी झाली आहे.
उप्पल, हैदराबादेत सुरू असलेल्या या सामन्यात रविवारचा पूर्ण दिवस टीम इंडियाच्या नावे राहिला. सेहवाग मोठी खेळी करू शकला नाही. अवघ्या 6 धावांवर त्याला पीटर सिडलने यष्टिरक्षक वेडकरवी झेलबाद केले. त्या वेळी टीम इंडियाच्या 17 धावा झाल्या होत्या. यानंतर पुजारा आणि मुरली विजय यांनी 294 धावांची अभेद्य भागीदारी केली. पुजाराने 11 व्या कसोटीत चौथे शतक ठोकले. विजयने 14 व्या कसोटीत दुसर्‍यांदा शतकी खेळी केली.
पहिल्या सत्रात संथ फलंदाजी
दिवसाच्या तीन सत्रांत वेगवेगळ्या शैलीत फलंदाजी बघायला मिळाली. भारताने पहिल्या सत्रात 27 षटकांत फक्त 49 धावा काढल्या. या सत्रात सेहवागची विकेटसुद्धा गमावली. या वेळी भारताच्या धावांची सरासरी प्रतिषटके दोनपेक्षासुद्धा कमी होती. लंच आणि टी ब्रेकच्या मध्ये भारताने दुसर्‍या सत्रात 33 षटकांत 106 धावा काढल्या. या वेळी धावांची सरासरी तीनपेक्षा अधिक होती.
तिसर्‍या सत्रात पॉवर प्ले
चहापानाच्या ब्रेकनंतर टीम इंडियाने 30 षटकांत 151 धावा काढल्या. पुजारा आणि विजयने या सत्रात फिरकीपटूंविरुद्ध मनमोकळेपणाने धावा काढल्या. दोघांनी जवळ उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून बरेच फटके मारले. वनडे सामन्यातील पॉवर प्लेचा तर खेळ सुरू नाही ना, असे ही खेळी बघून वाटत होते. विजयने एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चौकार मारून शतक पूर्ण केले. पुजाराने स्क्वेअर लेग बाउंड्रीवर षटकार खेचून आपल्या दीडशे धावा पूर्ण केल्या.
27 वर्षे जुना रेकॉर्ड मोडला
पुजारा आणि मुरली विजयने 294 धावांची अभेद्य भागीदारी करून 27 वर्षे जुना विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून ही दुसर्‍या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. यापूर्वीचा 224 धावांच्या भागीदारीचा रेकॉर्ड सुनील गावसकर आणि मोहिंदर अमरनाथ यांच्या नावावर होता. दोघांनी 1986 मध्ये ही कामगिरी केली होती.

मुरली विजयचे दुसरे शतक
मुरली विजयने कसोटी कारकीर्दीतील दुसरे शतक ठोकले. त्याने दोन्ही शतके ऑस्ट्रेलियाविरुद्धच ठोकली आहेत. यापूर्वी ऑक्टोबर 2010 मध्ये बंगळुरू येथे त्याने 139 धावा काढल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय खेळाडूंनी कोणत्याही विकेटसाठी केलेल्या सर्वोच्च् भागीदारीच्या यादीत 294 धावांची भागीदारी सहाव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक 376 धावांच्या भागीदारीचा रेकॉर्ड द्रविड आणि लक्ष्मणच्या नावे आहे. ही कामगिरी दोघांनी 2000-01 मध्ये कोलकाता कसोटीत केली होती.
पुजाराचे हे चौथे कसोटी शतक ठरले. चारपैकी दोन शतके इंग्लंडविरुद्ध आणि न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी एक शतक त्याने झळकावले.
उप्पलच्या मैदानावरही पुजाराचे हे सलग दुसरे शतक ठरले. यापूर्वी ऑगस्ट 2012 मध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध येथेच 159 धावा काढल्या होत्या. या मैदानावर दोन शतके झळकवणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
सेहवागचा गचाळ फॉर्म या वेळीही कायम राहिला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दहा डावांत त्याने अवघ्या 15.88 च्या सरासरीने एका अर्धशतकासह 158 धावा काढल्या आहेत.

यापेक्षा दुबळी फिरकी गोलंदाजी बघितली नाही : नवज्योतसिंग सिद्धू
ऑस्ट्रेलियाची फिरकी यापेक्षा दुबळी यापूर्वी कधीही बघितली नाही. ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास खचला आहे. भारत विजयाकडे आगेकूच करीत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बहुदा प्रथमच सामन्याच्या दुसर्‍याच दिवशी मी असे म्हणू शकतो की, भारताचा विजय निश्चित आहे. भारतीय टीम फॉर्मात परतली आहे, असेही सिद्धू म्हणाला.