सिडनी कसोटी- टीम / सिडनी कसोटी- टीम इंडिया 191 धावांवर गारद, ऑस्‍ट्रेलियाचेही तीन गडी बाद

दिव्‍य मराठी वेब टीम

Jan 03,2012 11:20:29 AM IST

सिडनी- भारत-ऑस्‍ट्रेलिया कसोटी मालिकेतील दुसर-या कसोटी सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाने 3 गडयांच्‍या बदल्‍यात 37 धावा केल्‍या आहेत. तीनही बळी झहीर खानने मिळवले. कर्णधार मायकेल क्‍लार्क आणि रिकी पॉंटिंग खेळत आहेत.
झहीर खानने भारतला पहिले यश मिळवून दिले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आठ धावांवर झेलबाद झाला. चेंडू त्‍याच्‍या बॅटची कड घेऊन स्लिपमध्‍ये उभ्‍या असलेल्‍या लक्ष्‍मणच्‍या हातात गेला पण त्‍याच्‍या हातातून तो निसटला त्‍यावेळी शेजारी उभ्‍या असलेल्‍या तेंडुलकरने चपळाईने झेल टिपला.
टीम इंडियाचा पहिला डाव 191 धावांवरच आटोपला. कर्णधार धोनीने नाबाद 57 धावा केल्‍या. पीटर सीडलने उमेश यादवला बाद करून भारतीय डाव संपवला. उमेश यादवला बाद करून पीटर सीडलने कसोटी बळींचेही शतक पूर्ण केले.
पॅटिन्‍सननंतर बेन हिल्‍फेनहासनेही भारतीय फलंदाजांच्‍या नाकीनाऊ आणले. चहापानापूर्वी हिल्‍फेनहासने लागोपाठच्‍या चेंडूवर दोन गडी टिपले. पहिल्‍यांदा स्थिरावलेला अश्विन आणि त्‍यानंतर पुढच्‍याच चेंडूवर झहीर खानला बाद केले. चहापानानंतरही हिल्‍फेनहासचा झंझावात सुरूच होता. त्‍याने इशांत शर्मालाही बाद केले.
तत्‍पूर्वी, जेम्‍स पॅटिन्‍सनने घातक गोलंदाजी करताना टीम इंडियाला चांगलेच अडचणीत आणले. पॅटिन्‍सनने महाशतकाकडे वाटचाल करणा-या सचिन तेंडुलकरला 41 धावांवर टिपले. पीटर सीडलने विराट कोहलीला बाद केले होते.
सलामीवीर वीरेंद्र सेहवागला पॅटिन्‍सने बाद केले. हिल्‍फेनहासच्‍या गोलंदाजीवर मिळालेल्‍या जीवदानाचा फायदा सेहवागला उचलता आला नाही. रिकी पॉंटिंगने दुस-या स्‍लीपमध्‍ये त्‍याचा झेल सोडला होता. त्‍यानंतर 30 धावांवर तो बाद झाला. सेहवाग पाठोपाठ व्‍हीव्‍हीएस लक्ष्‍मणही झटपट बाद झाला.
टीम इंडियाला गौतम गंभीरच्‍या रूपात पहिला धक्‍का बसला. पहिल्‍याच षटकाच्‍या तिस-या चेंडूवर गंभीर शून्‍य धावेवर तंबूत परतला. मेलबर्न कसोटीत हिरो ठरलेल्‍या जेम्‍स पॅटिन्‍सनने गंभीरला बाद केले. त्‍यानंतर भरवश्‍याचा फलंदाज राहुल द्रविडलाही काही खास करता आले नाही. पीटर सीडलने त्‍याला पाच धावांवर बाद केले.
यापूर्वी भारताने नाणेफेक जिंकून पहिल्‍यांदा फलंदाजी करण्‍याचा निर्णय घेतला. पहिल्‍या कसोटीत अपयशी ठरलेल्‍या विराट कोहलीला दुस-या कसोटीतही संधी देण्‍यात आली आहे. मालिकेत ऑस्‍ट्रेलिया 1-0 ने आघाडीवर आहे.

X
COMMENT