आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेपटाला पळता भुई थोडी!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅडिलेड - भारतीय क्रिकेट संघाची ऑस्ट्रेलियात पुरती वाताहत होण्यास प्रामुख्याने कचखाऊ फलंदाजी जबाबदार आहे. या फलंदाजीतील भारताच्या शेपटाला तर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजीसमोर पळता भुई थोडी झाली आहे.
मेलबोर्नच्या पहिल्या कसोटीत भारताच्या तळाच्या 5 विकेट 21 धावांत 10 षटकांत पडल्या. दुस-या डावात फिरकी गोलंदाजी करीत असल्यामुळे भारताच्या शेपटाला 52 धावांची भर टाकता आली.
सिडनी कसोटीत भारताचे शेपूट 13 धावांत गुंडाळले गेले. सिडनीच्या दुस-या डावात 7 बाद 286 या धावसंख्येवरून भारताला 400 धावसंख्या दाखविण्यात अश्विनच्या फलंदाजीचा आणि फिरकी गोलंदाज लिऑनला 20 षटके गोलंदाजी देण्याचा निर्णय घेणा-या ऑस्ट्रेलियाचाही हात होता. त्या वेळी भारताच्या तळाच्या तीन फलंदाजांनी 114 धावा काढल्या होत्या. पर्थ कसोटीत मात्र भारताचे शेपूट मूळ पदावर आले. फिरकी गोलंदाज लिऑन पर्थ कसोटीत खेळला नाही. त्यामुळे भारतीय शेपटाला एका टोकाकडून अनुभवायला मिळणारी शिथीलता लांबली नाही. पहिल्या डावात 9 धावांत 25 चेंडूंत भारताच्या शेवटच्या 4 विकेट पडल्या. दुस-या डावात तर त्यापेक्षा वाईट परिस्थिती होती. दुस-या डावात एकही धाव न काढता भारताचे शेवटचे 4 फलंदाज 7 चेंडूंत बाद झाले.
पीटर सिडल पॅटिलन, बेन हिल्फेनहॉस आदी ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी भारताच्या जहीर खान, उमेश यादव, इशांत शर्मा या गोलंदाजांना ‘थ्रोट बॉल’ने लक्ष्य केले आहे. फलंदाजाच्या बॅटीच्या किंवा यष्टीच्या दिशेने चेंडूचा रोख ठेवण्यापेक्षा शरीरवेधी चेंडू टाकून तळाच्या फलंदाजांवर मानसिक दबाव आणण्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाज यशस्वी ठरले आहेत. भारताची सहावी विकेट पडली की ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चेव चढतो. कारण शेवटचे 4 फलंदाज बाद करणे त्यांना कठीण गेले नाही. भारताच्या तळाच्या फलंदाजांना घेऊन खेळणा-या विराट कोहलीने तर एकदा दोन धावाही काढण्यास नकार दिला होता. कारण उमेश यादवला नंतरच्या षटकात पहिल्या चेंडूपासून खेळायला लागू नये हा हेतू होता. जेन्स पॅटिंसनला तर मेलबोर्न कसोटीत जहीर खानवर सलग चार उसळते चेंडू टाकल्याबद्दल पंचांनी ताकीद दिली होती. उसळत्या चेंडूवर खेळण्याची भारतीयांची असाहाय्यता पाहून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आक्रमणाचे हे तत्त्व स्वीकारले आहे.