आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथी कसोटी गुरुवारपासून : गंभीर, आर. अश्विन खेळणार ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅमिल्टन - भारत आणि इंग्लंडदरम्यान आयोजित पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या कसोटीला गुरुवारपासून ओल्ड ट्रॅफर्डवर सुरुवात होत आहे. या सामन्यात भारताकडून सलामीवीर गौतम गंभीर आणि ऑफस्पिनर आर. अश्विन मैदानावर खेळण्याची दाट शक्यता आहे.

मालिकेत सध्या दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. टीम इंडियाने लॉर्ड्स कसोटीत विजय मिळवल्यानंतर मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र, भारताला ही आघाडी कायम राखता आली नाही. तिसर्‍या कसोटीत भारताचा पराभव झाला. यामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीवीर गौतम गंभीरला शिखर धवनच्या जागी खेळण्याची संधी मिळू शकते. याशिवाय ऑफस्पिनर आर. अश्विनही खेळू शकतो.

ऑफस्पिनर अश्विनलाही मिळणार संधी?
इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीने तिसर्‍या कसोटीच्या एका डावात 7 गडी बाद केले. त्याने आतापर्यंत तीन कसोटीत 15 गडी बाद केले आहेत. तीन कसोटीत रवींद्र जडेजाला फुलटाइम फिरकीपटूची भूमिका पार पाडण्यात अपयश आल्याने आर. अश्विनला संधी मिळण्याची शक्यता आहे. जडेजाला तीन कसोटीत फक्त 8 विकेट घेता आल्या. पहिल्या कसोटीत तर त्याला एकही विकेट मिळाली नाही. याविरुद्ध आर. अश्विन मॅचविजेता फिरकीपटू आहे. त्याने 19 कसोटीत 104 बळी घेतले आहेत. त्याचा ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याची ऑफस्पिन फायद्याची ठरू शकते.

धवनचे अपयश
टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनला मागच्या सहा डावांत एकही अर्धशतक ठोकता आले नाही. त्याने मागच्या सहा डावांत अनुक्रमे 12, 29, 07, 31, 06, 37 अशा एकूण फक्त 122 धावा काढल्या. तिसर्‍या कसोटीसाठीच धवनला वगळण्याची शक्यता होती. मात्र, त्याला संधी मिळाली आणि त्याची कामगिरी साधारण ठरली. शिखरच्या जागी अनुभवी गौतम गंभीरला संधी मिळू शकते. गंभीरच्या नावे कसोटीत 4 हजारांपेक्षा अधिक धावा असून, 9 शतके त्याने ठोकली आहेत. फॉर्म परत मिळवून त्याने कसोटी संघात पुनरागमन केले. गंभीरकडे दुर्लक्ष होणे कठीण आहे.

(फोटो : इंग्लंड विरूध्दच्या चौथ्या कसोटीपूर्वी ओल्ड ट्रॅफर्डवर सरावादरम्यान टीम इंडियाचा सलामीवीर गौतम गंभीर आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा)