आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसोटी : घरच्या मैदानावरचे शेर.. मँचेस्टरवर 152 धावांत ढेर..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मँचेस्टर - घरच्या मैदानावर खोर्‍याने धावा काढून जगभर तोर्‍यात मिरवणार्‍या टीम इंडियाच्या फलंदाजांचे गुरुवारी पितळ उघडे पडले. मँचेस्टर कसोटीत इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाजांनी नांग्या टाकताना 152 धावांत गाशा गुंडाळला. प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडने पहिल्या दिवसअखेर 3 बाद 113 धावा काढल्या. अद्याप 39 धावांनी पिछाडीवर असलेल्या इंग्लंडकडे सात विकेट शिल्लक आहेत. संघाचे इयान बेल (45) व जॉर्डन (0) मैदानावर खेळत आहेत.

तत्पूर्वी भारताकडून धोनीने सर्वाधिक 71 धावा काढून शंभरच्या आता बाद होण्याची भारताची नामुष्की टाळली. भारताकडून तब्बल सहा फलंदाजांना भोपळासुद्धा फोडता आला नाही. धोनी (71), आश्विन (40), रहाणे (24) या तीनच फलंदाजांना दोनअंकी धावसंख्या गाठता आली. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने 25 धावांत 6 गडी बाद केले.

आठच्या स्कोअरवर 4 विकेट
भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर गौतम गंभीर चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अवघ्या 4 धावा काढून ब्रॉडच्या गोलंदाजीवर चौथ्या स्लीपमध्ये रूटकरवी झेलबाद झाला. दुसरा सलामीवीर मुरली विजय अँडरसनच्या गोलंदाजीवर पाचव्या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर भोपळा न फोडताच बाद झाला. तिसर्‍या क्रमांकावर खेळण्यास आलेला युवा खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि चौथ्या क्रमांकावरील विराट कोहलीकडून या वेळी मोठय़ा खेळीची आशा होती. कोहलीला 4.4 षटकांत अँडरसनने स्लीपमध्ये कुककरवी बाद केले.
पुढच्या षटकांच्या पहिल्याच चेंडूवर ब्रॉडने पुजाराला स्लीपमध्ये जॉर्डनकरवी टिपले. विशेष म्हणजे गंभीर, विजय, कोहली व पुजारा हे खेळाडू भारताच्या 8 धावांच्या स्कोअरवर बाद झाले. बिनबाद 7 धावांवरून 4 बाद 8 धावा असा संकटमय स्कोअर भारताचा झाला. भारताकडून युवा खेळाडू अजिंक्य रहाणेने 52 चेंडूंत 24 व आश्विनने 42 चेंडूंत 40 धावांचे योगदान दिले.

बॅलेन्स-बेलची अर्धशतकी भागीदारी
इंग्लंडची पहिल्या डावात निराशाजनक सुरुवात झाली. कुक (17) व रॉबसन (6) झटपट बाद झाले. त्यानंतर बॅलेन्स (37) व बेल (नाबाद 45) यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीने तिसर्‍या गड्यासाठी 77 धावांची भागीदारी करून संघाला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली. दरम्यान, वरून अँरोनने ही जोडी फोडली. त्याने बॅलेन्सला बाद केले.

धोनी एकटा लढला
भारताकडून कर्णधार धोनीने एकाकी लढत देताना 133 चेंडूंत 15 चौकारांसह 71 धावा काढल्या. धोनीमुळेच भारताला कसबसा शंभर धावांचा टप्पा ओलांडता आला. धोनीने रहाणेसोबत पाचव्या विकेटसाठी 54 धावांची, तर अश्विनसोबत 66 धावांची भागीदारी करून भारताची लाज राखली.

ब्रॉडने स्वानला टाकले मागे
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आपलाच सहकारी ऑफस्पिनर ग्रॅमी स्वानला संघाकडून सर्वाधिक विकेट घेण्याच्या कामगिरीत मागे टाकले. यासह त्याने यात सहाव्या स्थानी धडक मारली. निवृत्ती घेतलेल्या स्वानने 60 कसोटीत 255 विकेट घेतल्या होत्या. ब्रॉडने 77 कसोटीत 256 गडी बाद करण्याची कामगिरी आपल्या नावे नोंद केली.